या दिवशी रिलिज होणार ‘महापरिनिर्वाण’ चित्रपट

 या दिवशी रिलिज होणार ‘महापरिनिर्वाण’ चित्रपट

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्ययात्रेला ७ डिसेंबर १९५६ या दिवशी मुंबईमध्ये लाखोच्या संख्येने जनसमुदाय जमला होता. बाबासाहेबांच्या अंत्ययात्रा त्यांच्या राजगृह या मुंबईतील निवासस्थानावरून खोदादाद सर्कल, परळ ट्राम नाका, एल्फिन्स्टन ब्रिज, गोखले रोड, रानडे रोड अशा मार्गाने शिवाजी पार्कजवळील चौपाटीवर पोहोचली. लाखोंच्या संख्येत लोक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. मुंबईनं एवढी मोठी अंत्ययात्रा क्वचित पाहिली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ही अंतिम यात्रा आपल्या कॅमेरात टिपणाऱ्या नामदेवराव व्हटकर यांच्या जीवनावर आधारित ‘महापरिनिर्वाण’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता अनेकांना लागली होती. मात्र आता या चित्रपटाच्या प्रदर्शनची तारीख जाहीर झाली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच ६ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी घडलेल्या गुंतागुंतीच्या भावना व घटनांचा उलगडा करणाऱ्या नामदेवराव व्हटकर यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओक यांनं साकारली असून अंजली पाटील, कमलेश सावंत, गौरव मोरे हे कलाकारही या चित्रपटात झळकणार आहेत.

चित्रपटाबद्दल निर्माते सुनील शेळके म्हणाले, ” आम्हाला आनंद आहे, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आम्ही हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहोत. हा चित्रपट म्हणजे आमच्याकडून ही एक मानवंदना आहे. ‘एक कथा दोन इतिहास’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. असंख्य जनसागर त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी लोटला होता. यादरम्यान कोणत्या विशेष घटना घडल्या, कोण कोण उपस्थित होते, अशा अनेक गोष्टी ज्या अनेकांना माहित नाहीत, त्या विस्तृतपणे या चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत. अवघी मुंबापुरी यावेळी थांबली होती. हा मन सुन्न करणारा प्रसंग आपण नामदेवराव व्हटकर यांच्या नजरेतून पाहाणार आहोत.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका कोण साकारणार, हे सध्यातरी उघड झालेले नाही. कल्याणी पिक्चर्स प्रस्तुत, अभिता फिल्म निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शक शैलेंद्र बागडे आणि अमर कांबळे डीओपी आहेत. तर लेखन चेतक घेगडमल आहेत. व्हटकरांच्या भूमिकेबद्दल बोलताना प्रसोद ओक म्हणाला, नामदेव व्हटकर हे कवी, लेखक, नाटककार आणि आमदारदेखील होते. अशा व्यक्तिमत्त्वाची भूमिका मला साकारायला मिळतेय हे समाधानकारक आहे.

SL/ML/SL

23 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *