अकोला पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये बिघाडी

अकोला, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अकोला पश्चिम विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी काँग्रेसने साजिद खानपठाण यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर शिवसेनेने (उबाठा) पत्रकार परिषद घेऊन राजेश मिश्रा यांना उमेदवारी जाहीर केली. महाविकास आघाडीतून दोघांची उमेदवारी जाहीर केल्याने आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र आहे.
भाजपचे गोवर्धन शर्मा हे २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत अकोला पश्चिम या मतदार संघातून निवडून आले होते. त्यांना काँग्रेसचे साजिद खान पठाण यांनी कडवी झुंज दिली होती. अवघ्या अडीच हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. ही जागा काँग्रेसची असल्याने काँग्रेसचा प्रबळ दावा होता. त्यातच लोकसभेची जागा काँग्रेसच्या वाट्याला असल्याने विधानसभेची जागा ही शिवसेनेला सोडावी असा आग्रह शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी केला होता. त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तशी मागणीही केली होती. त्यानंतर घाईघाईत शुक्रवारी पत्रकार परिषद घेत शिवसेना शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या उमेदवारीची घोषणाही केली. मात्र, रात्री उशिरा काँग्रेसने अकोला पश्चिम विधानसभा पोट निवडणुकीचे उमेदवार म्हणून साजिदखान पठाण यांची उमेदवारी जाहीर केली.
ML/SL/ML
22 March 2024