व्हॉट्सअॅपवरील ‘विकसित भारत’ संदेश तत्काळ थांबवा
मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. त्यानंतर देशभरात आता आचारसंहिता लागू झाली. निवडणूक आयोग आता अधिक सतर्क झाला असून राजकीय पक्ष आचारसंहितेचे काटेकोर पालन होत आहे याकडे कटाक्षाने लक्ष देत आहे. आज आचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी EC ने मोदी सरकारला फटकारले आहे. लोकसभा निवडणुकीआधी देशातील कोट्यवधी लोकांना व्हॉट्स ऍपच्या माध्यमातून केंद्र सरकारनं एक मेसेज पाठवला. हा मेसेज केंद्र सरकारच्या विकसित भारताशी संबंधित आहे. यावरुन आता निवडणूक आयोगानं माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला व्हॉट्स ऍप मेसेज पाठवणं बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा होऊनही आणि आचारसंहिता लागू होऊनही नागरिकांच्या फोनवर असे संदेश वितरित केले जात असल्याच्या अनेक तक्रारी आयोगाला मिळाल्या होत्या. निवडणूक आयोगानं याबद्दल मंत्रालयाकडून अहवाल मागवला आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर, आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतरही सरकार व्हॉट्स ऍप मेसेज पाठवत असल्याच्या तक्रारी आयोगाला मिळाल्या होत्या. यावरुन निवडणूक आयोगानं माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला एक नोटिस बजावली आहे.
आम्ही व्हॉट्स ऍप मेसेज आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पाठवले होते. नेटवर्कमध्ये तांत्रिक अडचणी असल्यानं काही लोकांना मेसेज उशिरा पोहोचले असावेत, अशी सारवासारव केंद्र सरकारनं निवडणूक आयोगासमोर केली. आयोगानं या प्रकरणी अहवाल मागवला आहे. देशात सात टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातलं मतदान १९ एप्रिलला होईल. तर सातव्या टप्प्यातलं मतदान १ जूनला होईल. ४ जूनला निकाल घोषित केला जाईल.
महाराष्ट्रातील लोकसभा मतदानाचे वेळापत्रक
- पहिला टप्पा – १९ एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
- दुसरा टप्पा – २६ एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
- तिसरा टप्पा – ७ मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
- चौथा टप्पा – १३ मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
- पाचवा टप्पा – २० मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
SL/ML/SL
21 March 2024