विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीटीसह वादळी पाऊस

नागपूर, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उन्हाळ्याच्या तोंडावर राज्यात गारपीटीसह पाऊस होण्याच्या घटना गेल्या काही वर्षांत सातत्याने घडत आहेत. दुष्काळ आणि अन्य नैसर्गिक आपत्तींनी अगोदरच त्रासलेल्या विदर्भातील शेतकरी वर्गाला याचा त्रास सहन करावा लागतो. राज्यातील हवामानात गेल्या 48 तासांत सातत्याने बदल होत आहे. मंगळवारी राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे विदर्भात मोठे नुकसान झाले. अशात आजही विदर्भात गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार, आज भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात गारपीट होऊ शकते. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यासह येत्या 24 तासात विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस देखील होईल. तर 21 मार्चपासून पुणे परिसरात कमाल आणि किमान तापमानात 1 ते 2 अंशानी वाढ होईल, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
काल झालेल्या पावसामुळे उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी कापणी केलेल्या पिकांचे देखील मोठे नुकसान झाले. वर्धा जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागात गारपीट झाली. वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे वादळी वाऱ्यामुळे अनेक घरावरील पत्रे उडाले, तर अनेक झाडे कोसळली. गहू आणि चणा पिकांची काढणी शिल्लक होती. या पिकांचे मोठे नुकसान झाले. काही भागात केळीच्या बागांचेही नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे वादळी वाऱ्यासह गारपीट झाली.
मंगळवारी संध्याकाळी भंडारा जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे गहू, भात, मका या पिकांसह भाजीपाल्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. दरम्यान, पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
वर्धा, भंडाऱ्यासह गोंदिया जिल्ह्यात देखील गारपीट आणि वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. सडक अर्जुनी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्याने गहू पिकांसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.नागपूरमध्ये पारशिवनीत दुपारी झालेल्या गारपीटसह मुसळधार पाऊस झाला. चंद्रपूर जिल्ह्यात कोरपना तालुक्यात पावसासह गारपीट झाली. या पावसामुळे मिर्ची पिकाचे मोठे नुकसान झाले.
SL/ML/SL
20 March 2024