सर्वांधिक प्रदुषित देशांत भारत तिसऱ्या स्थानी
मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील महासत्तांना टक्कर देत आर्थिक आघाडीवर प्रगतीकडे वेगवान वाटचाल करत असताना आपल्या देशातील प्रदुषणातही प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. स्वीस एअर मॉनिटरिंग बॉडी IQAir केलेल्या सर्वेक्षणानुसार बांगलादेश आणि पाकिस्तानच्या पाठोपाठ भारत हा जगभरातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे. ‘वर्ल्ड एअर क्वॉलिटी रिपोर्ट २०२३’ च्या निष्कर्षांनुसार १३४ देशांच्या यादीत भारताचा प्रदूषित हवेच्या निकषांवर तिसरा क्रमांक लागतो. त्याशिवाय जगभरातील सर्वाधिक प्रदूषित ५० शहरांमध्ये एकट्या भारतातील ४२ शहरांचा समावेश आहे.
जगभरातील विविध देशांमधल्या हवेचा दर्जा तपासण्यासाठी पीएम २.५ चं प्रमाण हे मापक वापरण्यात आलं होतं. त्यानुसार भारतात प्रत्येक क्युबिक मीटर क्षेत्रात ५४.४ माक्रोग्रॅम पीएम २.५ चं केंद्रीकरण झाल्याचं निदर्शनास आलं. बांगलादेशमध्ये हे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच ७९.९ मायक्रोग्रॅम प्रतीक्युबिक मीटर तर त्यापाठोपाठ पाकिस्तानमध्ये हे प्रमाण ७३.७ मायक्रोग्रॅम प्रतीक्युबिक मीटर इतकं आढळून आलं. या सर्वेक्षणासाठी १३४ देशांमधील ७ हजार ८१२ ठिकाणी उभारण्यात आलेल्या तब्बल ३० हजार एअर स्टेशन्सच्या माध्यमातून माहिती गोळा करण्यात आली.
जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत भारतातल्या तब्बल ४२ शहरांचा समावेश आहे. जहभरातलं सर्वाधिक प्रदूषत शहर बिहारमधील बेगुसराय ठरलं असून त्यापाठोपाठ गुवाहाटी व दिल्ली या दोन शहरांचा अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक लागतो. बेगुसराय, गुवाहाटी आणि दिल्लीव्यतिरिक्त ग्रेटर नोएडा (११), मुझफ्फरनगर (१६), गुरगाव (१७), अराह (१८), दादरी (१९), पाटणा (२०), फरिदाबाद (२५), नोएडा (२६), मीरत (२८), गाझियाबाद (३५) आणि रोहतक (४७) या शहरांचा या यादीत समावेश आहे.
SL/ML/SL
19 March 2024