पुण्यात Ola आणि Uber चा परवाना रद्द

पुणे, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या पुणेकरांना आता अजून एका अडचणीचा सामना करावा लागणार आहे. पुण्यात ओला आणि उबेर या टॅक्सीसेवेचा परवाना प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रद्द केला आहे. त्यामुळे आता ओला आणि उबेर पुण्यात टॅक्सीसेवा देऊ शकणार नाही. याचा फटका या सेवेचा लाभ घेणाऱ्या हजारो पुणेकरांना बसणार आहे. या बंदीची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार, या बाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडलेली नाही.
रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्रालय दिल्ली यांचे मोटार व्हेईकल अॅग्रीगेटर गाईडलाईन्स २०२० अन्वये में. अॅनी टेक्नॉलॉजीज प्रा.लि. आणि में. उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा.लि. यांचे चारचाकी हलक्या वाहनांकरिता अॅग्रीगेटर लायसन्स मिळण्यासाठीचे अर्ज त्रुटींची पूर्तता करण्याकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे येथे प्रलंबित होते. दोन्ही अर्ज प्रादेशिक परिवहन प्राधिकरणासमोर ११ मार्च २०२४ रोजीच्या बैठकीत पुनर्विलोकनानंतर उचित निर्णयासाठी सादर करण्यात आले होते. मोटार व्हेईकल अॅग्रीगेटर गाईडलाईन्स, २०२० मधील तरतूदीची पूर्ण पूर्तता करीत नाहीत असे पुनर्विलोकनात आढळून आल्याने दोन्ही अर्ज नाकारण्यात आले. ही बैठक जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. आरटीओने या संदर्भात परिपत्रक काढत याची माहिती दिली आहे.
आरटीओच्या परिपत्रकात म्हटले आहे की, मोटार व्हेईकल अॅग्रीगेटर गाईडलाईन्स २०२० मधील तरतूदीची पूर्ण पूर्तता करीत नाहीत असे पुनर्विलोकनात आढळून आल्याने मे. अॅनी टेक्नॉलॉजीज प्रा.लि. आणि मे. उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा.लि. या दोन्ही अर्जदारांनी चारचाकी हलक्या वाहनांकरिता समुच्चयक अनुज्ञप्ती मिळण्याकरिता सादर केलेले अर्ज प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे यांनी नाकारण्याचा निर्णय घेतला आहे.
मोटार व्हेईकल अॅग्रिगेटर गाईडलाईन्स, २०२० च्या अधिनियमानुसार चारचाकी हलक्या वाहनांकरिता ॲॅग्रिगेटर लायसन्स मिळण्यासाठी ओला आणि उबेर यांचे अर्ज त्रुटींची पूर्तता करण्यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे प्रलंबित होते. या कंपन्या कायद्यात असणाऱ्या तरतुदींची पूर्ण पूर्तता करीत नाहीत, असे पुनर्विलोकनात आढळून आले. त्यामुळे या दोन्ही अर्जदारांनी चारचाकी हलक्या वाहनांकरिता प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी मागितली होती. मात्र ही परवानगी प्राधिकरणाच्या सोमवारी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, आरटीओने या संदर्भात परिपत्रक काढत याची माहिती दिली आहे.
या बाबत, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर म्हणाले, ओला आणि उबेर यांना तात्पुरता परवाना देण्यात आला होता. परिवहन नियमांचे पालन त्यांच्याकडून होत नव्हते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही कंपन्यांना नोटीस बजावली होती. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर आले नाही. त्यामुळे हा परवाना नाकारण्यात आला आहे. त्यामुळे आता शहरामध्ये सध्या होणारी ओला आणि उबेरची वाहतूक बेकायदेशीर ठरणार आहे.
SL/ML/SL
13 March 2024