एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे… मंत्रालयातील दालनातील पाटी बदलली..

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनाबाहेरील पाटी आता बदलण्यात आलेली आहे. शासनाने वडिलांच्या नावासोबत आईचे नाव लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनीही या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या प्रस्तावाची अंमलबजावणी करत यापुढे व्यक्तीने शासकीय दस्तऐवजावर यापुढे वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे देखील बंधनकारक करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला होता.या निर्णयाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्वतःपासून करायची असे ठरवले होते. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आधीच त्यांच्या पाट्या बदलल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार आजपासून त्यांच्या मंत्रालयीन दालनाबाहेर लिहिलेल्या नावात बदल करण्यात आला असून ते ‘एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे’ असे करण्यात आले आहे.
माणसाला जन्म देण्यापासून त्याला मोठे करून स्वतःच्या पायावर उभे करण्यात वडिलांचा बरोबरीने आईचा देखील तेवढाच वाटा असतो..तिचं श्रेय तिला मिळावे यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. समाजात वडिलांएवढेच आईचे महत्त्व देखील अधोरेखित व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून त्यांची अंमलबजावणी आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः सुरु केली आहे.
ML/ML/SL
13 March 2024