कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनस इमारतीचं उद्घाटन

कोल्हापूर ,दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आधुनिक सुविधांसह सज्ज असलेल्या कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या उपस्थितीत दूरदृष्य प्रणाली द्वारे उद्घाटन करण्यात आलं. कोल्हापूर विमानतळावर आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,खासदार धनंजय महाडिक, संजय मंडलिक आणि धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आवाडे, प्रकाश आबिटकर , राजेंद्र पाटील यड्रावकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे आदी कोल्हापुरात आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
उद्योग आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी कोल्हापूर विमानतळाचं विस्तारीकरण करण्यात आले आहे. त्या अंतर्गत विमानतळावर नवीन टर्मिनस इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीला कोल्हापूरच्या ऐतिहासिक परंपरेला साजेसं असं दर्शनी रूप देण्यात आलं आहे. यामुळे कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालणारी देखणी आणि सुसज्ञ अशी इमारत उभारली आहे.
या इमारतीत जाणाऱ्या प्रस्थान प्रवासी कक्षात छत्रपती शिवरायांच्या राजदरबाराचं भव्य तैलचित्र प्रवासी दालनात संपूर्ण भिंतीवरच रेखाटण्यात आलं आहे. यासह छत्रपती शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि करवीरच्या संस्थापिका रणरागिणी ताराराणी यांचीही तैलचित्रं विमानतळावर अत्यंत खूबीनं वापरण्यात आली आहेत.
या इमारतीत कोल्हापूरच्या वन्यजीव आणि निसर्ग सौंदर्याचं दर्शन घडणार आहे.
कोल्हापुरात आगमन होणाऱ्या प्रवाशांना करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई आणि दख्खनचा राजा श्री ज्योतिबाचं दर्शन होणार आहे. बॅग्स क्लेम रूममध्ये अंबाबाई आणि ज्योतिबाच्या भव्य प्रतिमा लावण्यात आल्या आहेत.
यासह रंकाळा, पन्हाळा, खिद्रापूरचं मंदिर अशा कोल्हापूरच्या पर्यटनाचं दर्शन घडवणाऱ्या भव्य कलाकृतींनी प्रवाशांचं स्वागत होणार आहे.
SL/ML/SL
10 March 2024