अमेरिकेत भारतीय डान्सरची हत्या

 अमेरिकेत भारतीय डान्सरची हत्या

मिसुरी, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेमध्ये भारतीयांच्या हत्या झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. या हत्यांमागील नेमकी कारणे गुलदस्त्यात असल्यामुळे भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच आज पश्चिम बंगालमधील भरतनाट्यम आणि कुचीपुडी डान्सर अमरनाथ घोष यांची अमेरिकेतील मिसुरी राज्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. टेलिव्हिजन अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने शुक्रवारी अमरनाथ घोष यांच्या हत्येची माहिती दिली.घोष 27 फेब्रुवारी रोजी सेंट लुईस अकादमीजवळ संध्याकाळचा फेरफटका मारण्यासाठी निघाले असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

भट्टाचार्जी यांनी 1 मार्च रोजी सोशल मीडियावर या घटनेची माहिती दिली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अमेरिकेतील भारतीय दूतावासाकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. एक्सवर माहिती देताना भट्टाचार्जी म्हणाली- घोष यांनी सेंट लुईस येथील वॉशिंग्टन विद्यापीठात शिक्षण घेतले. ते फाइन आर्ट्समध्ये मास्टर्स करत होते. त्यांचे आई-वडील आधीच मरण पावले होते.

भारतीय दूतावासाने म्हटले- सेंट लुईस, मिसूरी येथे मारले गेलेले अमरनाथ घोष यांच्या कुटुंबीय आणि मित्रांप्रती शोक व्यक्त करतो. आम्ही फॉरेन्सिक टीम आणि पोलिसांना त्यांच्या तपासात मदत करत आहोत.अमेरिकेत भारतीयांच्या मृत्यूच्या घटना वाढल्या आहेत. या हल्ल्यांवर व्हाईट हाऊसने म्हटले आहे की, वंश, लिंग किंवा इतर कोणत्याही आधारावर हिंसाचार अमेरिकेत अस्वीकार्य आहे. व्हाईट हाऊसमधील अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी म्हणाले की, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि त्यांचे प्रशासन हे हल्ले रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

दरम्यान 24 फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या अलाबामा राज्यात एका शीख व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. राज सिंग (गोल्डी) यांना गुरुद्वाराबाहेर गोळ्या घातल्या. ते उत्तर प्रदेशातील बिजनौरचे रहिवासी होते. हल्लेखोरांचा आणि हत्येमागचा हेतू मिळू शकला नाही.हे हेट क्राईमचे प्रकरण असू शकते, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. राज सिंह हे दीड वर्षांपूर्वीच अमेरिकेला गेले होते. ते संगीतकार होते आणि त्यांच्या संगीत समूहासोबत राहत होते.15 फेब्रुवारी रोजी अलाबामामध्ये एका भारतीय वंशाच्या हॉटेल मालकाची एका ग्राहकाने गोळ्या झाडून हत्या केली होती. एका खोलीवरून दोघांमध्ये वाद झाला. पोलिसांनी सांगितले होते.

SL/KA/SL

2 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *