गरीब , निर्धन रुग्णांना खासगी, धर्मदाय रुग्णालयात मिळणार खात्रीशीर बेड
ठाणे, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील खासगी आणि धर्मदाय रुग्णालयात गरीब, निर्धन रुग्णांना मोफत उपचार मिळावे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मंत्रालयातील मुख्य इमारतमधील पाचव्या मजल्यावर विशेष वैद्यकीय मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून राज्यातील खासगी तसेच धर्मदाय रुग्णालयात आरक्षित १० टक्के खाटा उपचारासाठी रुग्णांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या राज्यस्तरीय वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख म्हणून आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांची नेमणुक महाराष्ट्र सरकारच्यावतीने करण्यात आली आहे.
निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांवर मोफत तसेच सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार मिळण्याकरिता उच्च न्यायालयाने योजना तयार केली आहे. त्यानुसार, प्रत्येक खासगी तसेच धर्मादाय रुग्णालयाने त्यांच्या रुग्णालयातील एकूण खाटांपैकी १०% खाटा निर्धन रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी व १०% खाटा दुर्बल घटकातील रुग्णांवर सवलतीच्या दराने उपचार करण्यासाठी राखून ठेवणे या रूग्णालयांना बंधनकारक आहे.तथापि, निर्धन , दुर्बल घटकातील रूग्णांना या सवलतीच्या खाटा पारदर्शकपणे उपलब्ध होत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
सदर रुग्णालये धर्मादाय स्वरूपाची असल्याने त्यांना शासनाच्या अनेक सवलतींचा फायदा होतो. मात्र रूग्णालये गरीबांसाठी आरक्षित खाटा त्यांना पारदर्शकपणे उपलब्ध करून देण्याच्या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करत नसल्याने त्याचा फायदा शासनास अपेक्षित असलेल्या निर्धन तथा गरीब रुग्णांना होत नाही. त्यामुळे या खासगी रुग्णालयातील १० टक्के आरक्षित बेड संदर्भातील रिअल टाईम माहिती रुग्णांना मिळावी म्हणून एक स्वतंत्र यंत्रणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
हा कक्ष धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन आणि दुर्बल घटकातील रूग्णांसाठी पारदर्शक पद्धतीने तातडीने उपलब्ध करून देणे तसेच त्यावर देखरेख ठेवणार आहे. या राज्यस्तरीय विशेष मदत कक्षाचे प्रमुख आरोग्यदूत रामेश्वर नाईक हे आहेत. राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष हा मंत्रालयातील मुख्य इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावर कार्यान्वित झाला आहे. सदर कक्षाचे उद्घाटन लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. कक्षाचे कामकाज रुग्णासंबंधित असल्याने, उद्घाटन होण्यापूर्वीच तातडीने कार्यान्वित करण्यात आला असून रोज अनेक निर्धन , दुर्बल रूग्णांना धर्मादाय रुग्णालयात खाटा उपचारासाठी उपलब्ध करून देण्याचे काम सुरु आहे.
मदतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
रुग्णांचे आधार कार्ड, रेशनकार्ड,तहसीलदारकडून उत्पन्न दाखला,डॉक्टरकडून खर्चाची कोटेशन तसेच प्रिस्किप्शन
ML/KA/SL
2 March 2024