भविष्यातील पिढ्यांच्या कल्याणासाठी वेल्स शिष्टमंडळ-पालिका प्रशासनात चर्चा

 भविष्यातील पिढ्यांच्या कल्याणासाठी वेल्स शिष्टमंडळ-पालिका प्रशासनात चर्चा

मुंबई दि.1(एम एमसी न्यूज नेटवर्क) : ‘भविष्यातील पिढ्यांचे कल्याण’ (द वेल बिइंग ऑफ फ्युचर जनरेशन्स अॅक्ट २०१५) या कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी वेल्स (यूके) च्या शिष्टमंडळाने बृहन्मुंबई महानगरपालिकेला भेट दिली. राज्याचे कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या शिष्टमंडळाशी चर्चा केली. येणाऱ्या पिढ्यांसाठी वेल्स देशाने हाती घेतलेल्या या व्यापक मोहिमेबाबत शिष्टमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी भविष्यातील शाश्वत विकास, उद्योग, शिक्षण, रोजगार, पर्यावरण, आदी विषयांवर उहापोह केला.

मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महानगरपालिकेतील त्यांच्या संपर्क कार्यालयात या शिष्टमंडळाचे स्वागत केले. यावेळी शिष्टमंडळातील वेल्सच्या फ्युचर जनरेशन विभागाचे आयुक्त डेरेक वॉकर, युनिव्हर्सिटी ऑफ वेल्सच्या कुलगुरू कार्यालयातील मुख्य अधिकारी शॉन ह्यूजेस आणि सार्वजनिक कार्यक्रम विभागाचे अधिष्टाता डॉ. जेरेमी स्मिथ यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उप आयुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, सहायक आयुक्त किरण दिघावकर, संचालक (नियोजन) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी आदींसह महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी शिष्टमंडळाला बृहन्मुंबई महानगरपालिका राबवत असलेल्या विविध उपक्रम, प्रकल्पांची माहिती दिली. यूनायटेड किंगडममधील वेल्स या घटक देशाने ‘भविष्यातील पिढ्यांचे कल्याण’ (द वेल बिइंग ऑफ फ्युचर जनरेशन्स अॅक्ट २०१५) कायद्याबाबत जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. त्याच अनुषंगाने हे शिष्टमंडळ भारतात आले आहे. या अंतर्गत आज (१ मार्च ) त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला भेट दिली.

शाश्वत विकास ही मध्यवर्ती संकल्पना गृहीत धरून वेल्सने भविष्यकालीन उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये येणाऱ्या पिढीचे आयुष्य अधिकाधिक कसे चांगले आणि सुदृढ असेल यावर भर देण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून जास्तीत जास्त सार्वजनिक वाहनांचा वापर, पायी चालणे, सायकल चालविणे, अतिशय कमी प्रमाणात कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करणाऱ्या वाहनांचा वापर, कचऱ्याचे विघटन आदींवर वेल्सने गत काही वर्षांपासून काम करण्यात सुरुवात केली आहे. त्यासाठी प्रतिबंध, सहयोग, एकत्रिकरण, सहभाग आणि दीर्घकालीन या पंचसूत्रीचा वापर करण्यात येत आहे. याच पंचसूत्रीवर आधारित शाश्वत विकास, पायाभूत सुविधा, शिक्षण, पर्यावरण, वाहतूक आदींबाबत एखादा प्रशिक्षण उपक्रम महाराष्ट्र शासनासोबत आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेसोबत राबविण्याची तयारी या शिष्टमंडळाने दर्शवली. याबाबत पालकमंत्री श्री. लोढा यांनी देखील सहमती दर्शविली असून, लवकरच अशा प्रकारचा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचे आश्वासन श्री. लोढा यांनी दिले.

त्यानंतर वेल्सच्या शिष्टमंडळाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला भेट देत तेथील कामकाज, तंत्रज्ञान, उपाययोजना आदींची माहिती जाणून घेतली. यावेळी संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन विभाग) श्री. महेश नार्वेकर यांनी शिष्टमंडळाला माहिती दिली. महापूर, भूस्खलन, आगीच्या घटना, दहशतवादी हल्ला, बॉम्बस्फोट, कोविड काळात करण्यात आलेल्या कार्यावर आधारीत चित्रफित यावेळी दाखवण्यात आली.

ML/KA/SL

1 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *