कपिल पाटील यांच्या हस्ते ‘इकॅमेक्स २४’ प्रदर्शनाचे उद्घाटन
मुंबई दि.29(एम एमसी न्यूज नेटवर्क) : इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (इकॅम) संघटनेच्या शताब्दी वर्षानिमित्त ग्राहकांच्या विद्युत सुरक्षा विषयक जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या “इकॅमेक्स २४” या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री कपिल मोरेश्वर पाटोल यांच्या हस्ते बॉम्बे एक्झिबिशन सेंटर (नेस्को), गोरेगाव, मुंबई येथे संपन्न झाले. याप्रसंगी मा.खासदार गोपाल शेट्टी, आर आर केबलचे राजेश काबरा, पॉलीकॅबचे सीईओ भूषण सहानी, ग्रेटव्हाईट कंपनीचे जनरल मॅनेजर मिलिंद धोंगडे यांच्यासह इकॅम महासमितीचे अध्यक्ष वामन भुरे, उपाध्यक्ष उमेश रेखे, महासमितीचे सचिव देवांग ठाकूर, खजिनदार रावसाहेब रकिबे, इकॅमेक्स 24 चे अध्यक्ष मारुती माळी हे उपस्थित होते. याप्रसंगी इकॅम प्रकाशित आर्टिफिशियल इंटेलिजट इलेक्ट्रिसिटी या पुस्तकाचे आणि आय.ई.सी.टी या मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांनी केले. सलग तीन दिवस सुरू असलेल्या या प्रदर्शनास जन – सामान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
केंद्रिय मंत्री कपिल पाटील याप्रसंगी म्हणाले की, सुरक्षा संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनाचे आयोजन केल्याबद्दल इकॅमचे कौतुक करावे तितके कमीच आहे. कोणत्याही संघटनेत निस्पृह कार्यकर्ते असल्याशिवाय हे शक्य नाही. जगाच्या पाठीवर अशा मोजक्या संघटना असतील त्यामध्ये ही इकॅम आहे. मी इकॅमला सर्वतोपरी मदत करण्यास कायम तयार आहे. खासदार गोपाल शेट्टी म्हणाले की, मी प्रथमता इकॅमला मनापासून शुभेच्छा देतो. शंभर वर्षांपूर्वी ज्यांनी इकॅमची स्थापना केली, त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार संपूर्ण भारत देश प्रकाशमान करायचा आहे. आज बहुतांशी भागात वीज पुरवठा होत आहे. येणाऱ्या काळात नवनवीन संसाधनामार्फत वीज उत्पादन वाढवून सर्वत्र स्वस्त दरात व दर्जेदार वीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी नरेंद्र मोदी आग्रही आहेत.
महासमितीचे अध्यक्ष वामन भुरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आमची इकॅम ही संस्था शतकमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. विविध माध्यमातून सभासदांसाठी अनेक कामे करत आहे. त्याबरोबरच सामाजिक बांधिलकीच्या भावनेने सामान्य जनता, वीजग्राहक यांच्या प्रबोधनासाठी वारंवार विविध उपक्रम राबवले जातात. खेडोपाडी जाऊन सामान्य जनता व शेतकरी यांचेसाठी वीज सुरक्षा याबाबत संघटनेच्या माध्यमातून प्रबोधन करत आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी विद्युत ठेकेदारी व्यवसायात यावे यासाठी इकॅमचे माध्यमातून प्रशिक्षण दिले जाते. वीज बचत आणि वीज सुरक्षा या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी आमची संस्था प्रयत्नशील आहे. विद्युत कायद्यानुसार परवानाधारक विद्युत ठेकेदारांनीच काम करावे यासाठी पाठपुरावा करीत आहे. अल्पज्ञान असलेल्या अनधिकृत ठेकेदारांनी कामे केल्यास विद्युत अपघात होण्याचा धोका वाढतो. हे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले त्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात मारुती माळी, अमेय कांनव, अमोल कोळपकर यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महासचिव देवांग ठाकूर यांनी केले तर सूत्रसंचालन स्वाती पेंडसे यांनी केले.
ML/KA/SL
29 Feb. 2024