कृष्णा नदीच्या प्रदुषणाबद्दल सांगली मनपाला ९० कोटींचा दंड

 कृष्णा नदीच्या प्रदुषणाबद्दल सांगली मनपाला ९० कोटींचा दंड

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राच्या जीवनवाहिन्यांपैकी एक प्रमुख नदी असलेल्या कृष्णा नदीच्या प्रदुषणाने गेल्या काही वर्षांपासून गंभीर रूप धारण केले आहे. यामुळे जलचरांचे जीवन धोक्यात आले आहे. याला कारणीभूत आहेत ते नदीकाठावरील कारखान्यांत तयार होणारे रसायनयुक्त पाणी. या गंभीर समस्येला जबाबदार असल्याचा ठपका ठेवत आता प्रदुषण महामंडळाने सांगली पालिकेवर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रक्रिया न करता सांडपाणी सोडून कृष्णा नदी प्रदुषित केल्याबद्दल सांगली महापालिकेला ९० कोटी रूपयांचा दंड प्रदुषण नियंत्रण मंडळाने ठोठावला असल्याची माहिती अ‍ॅड. ओंकार वांगीकर, सुनील फराटे व तानाजी रूईकर यांनी आज पत्रकार बैठकीत दिली.

जुलै व ऑगस्ट २०२२ मध्ये कृष्णेतील पाणी प्रदुषणामुळे मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी नदी प्रदुषणाची सखोल चौकशी करून दोषीविरूध्द कारवाई करण्यासाठी श्री. फराटे यांच्यावतीने हरित न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. हरित न्यायालयाने चौकशी समिती नियुक्त करून अहवाल मागवला होता. चौकशी समितीच्या अहवालानुसार काही कारखाने आणि सांगली महापालिका यांना नदी प्रदुषणास जबाबदार ठरविण्यात आले होते. यानुसार काही कारखान्यांना दंड ठोठावण्यात आला.

प्रदुषण नियंत्रण मंडळाने नदी प्रदुषित केल्याबद्दल महापालिकेला ९० कोटींच्या दंडाची नोटीस दि. १७ फेब्रुवारी रोजी बजावली आहे. दंडाची रक्कम येत्या १५ दिवसात भरण्याचे निर्देशही नोटीसमध्ये देण्यात आले आहेत. सुनावणी वेळी याचिकाकर्त्यांवतीने अ‍ॅड. वांगीकर यांनी वारंवार महापालिकेवर दंडाची कारवाई केली जात असतानाही प्रक्रिया न करता सांडपाणी नदीत सोडले जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर या प्रकरणी उचित कारवाईचे निर्देश प्रदुषण मंडळाला न्यायालयाने दिले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

SL/KA/SL

19 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *