सीता आणि अकबर एकत्रित आल्याने, विहिंप ची कोर्टात धाव
सिलीगुडी, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धार्मिक कट्टरतावादी संघटना धर्माचा अपमान झाल्याचे कारण देत कधी कोणाला वेठीस धरतील ते सांगता येत नाही.अशाच प्रकारचा एक हास्यास्पद प्रकार बंगालमधून समोर आला आहे. धार्मिक कुरघोडी करण्यासाठी चक्क प्राण्यांच्या नावांवरून धार्मिक भावना दुखावल्याचा स्टंट करण्यात आला आहे. यावरून कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. सिलीगुडी सफारी पार्कमध्ये ‘अकबर’ नावाच्या सिंहासह ‘सीता’ नावाच्या सिंहिणीला ठेवल्याप्रकरणी विश्व हिंदू परिषदने कलकत्ता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सिलीगुडीच्या सफारीत ‘अकबर’ नावाच्या सिंहाला ‘सीता’ नावाच्या सिंहीणीसोबत कथितपणे ठेवण्याच्या वनविभागाच्या निर्णयाला विश्व हिंदू परिषदेच्या बंगाल शाखेने कलकत्ता उच्च न्यायालयाच्या जलपाईगुडी येथील सर्किट बेंचमध्ये आव्हान दिले. दरम्यान, १६ फेब्रुवारी 2024 रोजी न्यायमूर्ती सौगता भट्टाचार्य यांच्या खंडपीठासमोर या याचिकेचा उल्लेख करण्यात आला. या याचिकेवर येत्या २० फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नर सिंह अकबर आणि मादी सिंह सिता यांना अलिकडेच त्रिपुरातील सेपाहिजाला प्राणी उद्यानातून आणण्यात आले. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे सिंह सिलीगुडीच्या सफारी पार्कमध्ये येण्यापूर्वीच त्यांचे नाव ठेवण्यात आली आहेत. यामुळे त्यांच्या नावात बदल करण्यात आला नाही. उल्लेखनीय म्हणजे, अकबर हा उपखंडातील प्रख्यात मुघल सम्राटांपैकी एक होता. तर, सीता वाल्मिकीच्या रामायणातील एक पात्र आहे आणि हिंदू धर्मात त्यांना देवता मानले जाते.
विश्व हिंदू परिषदने कलकत्ता उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत असे नमूद केले आहे की, सिंहांना राज्याच्या वनविभागाने नाव दिले आहे. अकबर नावाच्या सिंहाला सिता नावाच्या सिंहिणीसोबत ठेवणे हिंदू धर्माचा अपमान ठरेल. यामुळे या सिंहाचे नाव बदलण्यात यावे, अशी या याचिकेद्वारे विनंती करण्यात आली आहे. राज्याचे वन प्राधिकरण आणि बंगालच्या सफारी पार्क संचालकांना या खटल्यात पक्षकार करण्यात आले आहे. या याचिकेवर आता मंगळवारी २० फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.
SL/KA/SL
17 Feb. 2024