राज्यसभेसाठी सात उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील विधानसभा सदस्यांमधून निवडून देण्याच्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज शेवटच्या दिवशी सात उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असून त्यातून कोणी माघार न घेतल्यास मतदान घेणे आवश्यक ठरणार आहे.
आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती , त्यामुळे आजच सर्व पक्षाच्या उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले. भाजपाच्या डॉ मेधा कुलकर्णी, डॉ अजित गोपछडे, अशोक चव्हाण यांनी , काँग्रेसच्या चंद्रकांत हांडोरे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) कडून प्रफुल्ल पटेल आणि शिवसेना शिंदे गटाच्या मिलिंद देवरा यांनी आपले अर्ज दाखल केले. मात्र सातवा उमेदवार म्हणून आयत्यावेळी विश्वास जगताप यांनी आपली उमेदवारी दाखल केल्याने आता चुरस निर्माण झाली आहे.
उद्या दुपारी अर्जांची छाननी होणार असून त्यात जे अर्ज शिल्लक राहतील त्यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून असेल . जगताप यांचे सूचक आणि अनुमोदक कोण ते स्पष्ट झालेले नाही त्यामुळे ते नेमके कोणाच्या पाठिंब्यावर उभे राहिले आहेत तेही अद्याप गुलदस्त्यात आहे. यामुळे सात ही उमेदवार कायम राहिले तर येत्या २७ फेब्रुवारी रोजी यासाठी मतदान घ्यावे लागणार आहे.
ML/KA/SL
15 Feb. 2024