पंतप्रधान मोदींच्या हस्ते अबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिरांचे उद्गाटन

अबुधाबी, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून सध्या ते संयुक्त अरब अमिराती (UAE) ची राजधानी अबुधाबी येथे आहेत. येथे त्यांनी आज अबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराचं उद्घाटन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे पूजा केली. यावेळी अक्षय कुमार, विवेक ओबेरॉय आणि तारक मेहता का उल्टा चष्मा फेम दिलीप जोशी यांनीही मंदिराला भेट दिली. या बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण मंदिरावर (BAPS) सर्वांचे लक्ष लागले आहे.
आबू धाबीचे हे मंदिर 27 एकरात पसरले आहे आणि ते बोचासन निवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था म्हणजेच BAPS यांनी बांधले आहे. या बांधकामासाठी 700 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हे मंदिर आपल्या भव्यतेने जगभरातील लोकांना आकर्षित करत आहे. या मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यात भारताची झलक पाहायला मिळते. वाराणसीच्या घाटांचे दृश्यही येथे दिसते. मंदिरातील 7 गर्भगृहातील मूर्ती भारतातील विविध ठिकाणांहून आल्या आहेत. प्रत्येक देवतेच्या मंदिरांच्या बाहेर, त्यांच्याशी संबंधित लीला दगडांवर कोरलेल्या आहेत. जसे राम मंदिर – रामायण. कृष्ण मंदिरात – भागवत. भारतीय परंपरेतील प्राणी – गाय, हत्ती, मोर यांच्यासह अरब देशाचा उंट, वाळवंटातील शेळी, गरुड, अननस, खजूर आदी फळांनाही भिंतींवर स्थान देण्यात आले आहे. हे मंदिर 108 फूट उंच आहे. यामध्ये 40,000 घनफूट संगमरवरी, 1,80,000 घनफूट वाळूचा खडक, 18,00,000 विटा वापरण्यात आल्या आहेत. याशिवाय मंदिरात 300 सेन्सरही लावण्यात आले आहेत.
फोटो शेअर करताना अक्षय कुमारने कॅप्शन लिहिले – अबू धाबी येथील (BAPS) स्वामीनारायण मंदिराच्या उद्घाटनाचा एक भाग बनण्याचा बहुमान मिळाला. किती ऐतिहासिक क्षण! एक व्हिडिओ क्लिपही इंटरनेटवर व्हायरल होताना दिसत आहे. क्लिपमध्ये अक्षय कुमार सुरक्षेने वेढलेल्या मंदिराकडे जाताना दिसत आहे. या उद्घाटन सोहळ्याचा एक फोटोही समोर आला आहे, ज्यामध्ये विवेक ओबेरॉयदेखील दिसत आहे.
SL/KA/SL
15 Feb. 2024