आप नेते मनीष सिसोदिया यांना मिळाला अंतरिम जामीन

नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यात जवळपास वर्षभरापासून तिहार तुरुंगात असलेले आम आदमी पक्षाचे (AAP) ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांना अंतरिम जामीन मिळाला आहे. तीन दिवसांसाठी ते तुरुंगातून बाहेर येणार आहेत. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना त्यांच्या भाचीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी हा दिलासा देण्यात आला आहे. 13 ते 15 फेब्रुवारीपर्यंत ते तुरुंगाबाहेर राहणार आहेत.सिसोदिया यांनी आपल्या भाचीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी राऊस एव्हेन्यू न्यायालयात अंतरिम जामीन मागितला होता. त्यांच्या भाचीचे लखनौमध्ये 14 फेब्रुवारीला लग्न आहे. मनीष सिसोदिया यांच्या याचिकेला ईडीने विरोध केला होता.
मात्र न्यायालयाने सिसोदिया यांची याचिका मान्य करत त्यांना तीन दिवसांसाठी लखनौला जाण्याची परवानगी दिली. अटकेनंतर सिसोदिया तुरुंगाबाहेर रात्र काढण्याची ही पहिलीच वेळ आहे.दरम्यान, मनीष सिसोदिया यांना सीबीआयने गेल्या वर्षी 26 फेब्रुवारी रोजी कथित दारू घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात अटक केली होती. सिसोदिया गेल्या वर्षभरापासून तिहार तुरुंगात आहेत.त्यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयात फेटाळण्यात आला होता. पत्नीच्या आजारपणाचे कारण देत त्यांनी दिलासाही मागितला होता. मात्र अलीकडेच त्यांना आठवड्यातून एकदा पत्नीला भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे.
नोव्हेंबर २०२२ मध्ये दिल्ली सरकारने नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू केले होते. या धोरणामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होईल आणि मद्य माफियांवर अंकुश बसेल, असा विश्वास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी व्यक्त केला होता. त्यामुळे या धोरणाअंतर्गत सर्व सरकारी आणि खासगी दारूची दुकानं बंद करून नवीन निविदा जारी करण्यात आल्या होत्या. या अगोदर दिल्लीत ७२० दारूची दुकाने होती. त्यापैकी २६० खासगी दुकाने होती. मात्र, नवीन धोरणानंतर सर्व दुकाने खासगी व्यवसायिकांच्या ताब्यात गेली. यावर दिल्लीच्या उपराज्यपालांनी आक्षेप घेतला होता. हे धोरण राबवताना गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
SL/KA/SL
12 Feb. 2024