राज्यातील काँग्रेसमध्ये भूकंप , अशोक चव्हाण राजीनामा देऊन भाजपात
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यातील काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला असून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अशोकराव चव्हाण यांनी आमदारकीचा आणि काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे, त्यांच्यासोबत आणखी १३ आमदार राजीनामा देत असून त्यात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचाही समावेश आहे.
राज्यात आधी शिवसेना ,मग राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात उभी फूट पडल्यानंतर केवळ काँग्रेस पक्षच मोकळा राहिला होता. आज तोही फुटला असून बरेच दिवस चर्चेत असलेल्या अशोक चव्हाण यांनी अखेर आज निर्णय घेत भाजपचा रस्ता धरला आहे. त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातून काँग्रेसचा एकही सदस्य राज्यसभेवर निवडून जाऊ शकणार नाही.
महा विकास आघाडी सरकार पडून शिवसेना शिंदे गट आणि भाजपा सरकार सत्तेवर येताना विधानसभेत विश्वासदर्शक ठराव संमत करण्यात आला त्यावेळी अनुपस्थित राहिल्याने अशोक चव्हाण चर्चेत आले होते , मात्र गेले दीड वर्षे त्यांनी काँग्रेसमध्येच राहणे पसंत केले होते. गेल्या दोन तीन महिन्यांपासून अशोक चव्हाण भाजपात येण्याच्या चर्चा सुरू होत्या , नांदेडचे भाजपा खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी याबाबत अनेकवेळा वक्तव्ये केली होती. त्यांच्यासोबत असणाऱ्या विजय वडेट्टीवार यांना विधानसभेत विरोधी पक्षनेते पद देऊन शांत करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला होता.
वडेट्टीवार हे देखील भाजपात येण्याच्या चर्चा आधीपासूनच होत्या मात्र प्रत्यक्षात ते घडत नव्हते . आज वेगाने घडामोडी घडल्या आणि अशोक चव्हाण यांनी आधी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सादर केला, त्यांनी तो लगेच स्वीकारला आणि मग चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहून आपल्या काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा दिला.त्यांना भाजपा राज्यसभेवर जाण्यास सांगेल अशी चर्चा आहे.यामुळे राज्यातून सहाही उमेदवार महायुतीचे निवडले जातील .
ML/KA/PGB 12 Feb 2024