ईव्हीएम चोरी प्रकरणी तीन वरिष्ठ अधिकारी निलंबित , उच्च स्तरीय चौकशी सुरू

मुंबई ,दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे जिल्ह्यात सासवड इथून पोलीस बंदोबस्तात असणारे ईव्हीएम् मशीनचे नियंत्रण युनिट चोरी झाल्याप्रकरणी पुरंदरचे प्रांत अधिकारी, तहसीलदार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांना तातडीने निलंबित करण्यात आले असून निवडणूक आयोगाने उच्च स्तरीय चौकशी सुरू केली आहे.
पुरंदर तालुक्यातील सासवड इथल्या पोलीस बंदोबस्तात असणारे हे मशीन चोरीला गेल्याचे प्रकरण निवडणूक आयोगाने अत्यंत गांभीर्याने घेतल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. आयोगाने या तिन्ही अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करून त्यांची चौकशी सुरू करण्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत असे देशपांडे यांनी सांगितले.
याशिवाय पुण्याचे जिल्हाधिकारी यांची ती संपूर्ण जबाबदारी असल्याने त्यांच्याकडून संपूर्ण अहवाल तातडीने मागवून घेण्याचेही आदेश आयोगाने दिले आहेत. त्यासोबतच पुण्याचे विभागीय आयुक्त आणि कोल्हापूर क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांची समिती नेमून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश ही आपल्याला दिल्याचे देशपांडे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान चोरी करण्यात आलेले यंत्र शोधून काढण्यात आले असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. चोरीला गेलेले आणि आता सापडलेले यंत्र एकच आहे याची खात्री करण्यात आली आहे, प्रत्यक्ष मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रांपैकी हे यंत्र नव्हते , ते केवळ प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी राखून ठेवलेल्यापैकी होते असेही श्रीकांत देशपांडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
ML/KA/SL
7 Feb. 2024