कृष्णा – मराठवाडा सिंचन प्रकल्पांचे पाणी तुळजापुरात लवकरच

धाराशिव, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठवाड्याच्या हक्काचं कृष्णा खोऱ्यातील पाणी मराठवाड्याला देण्यासाठी महायुती सरकारनं निधीची तरतूद करून या कामाला गती दिली आहे. दर दोन-तीन वर्षाला उद्भवणाऱ्या कायमस्वरूपी दुष्काळी परिस्थितीवर मात करून मराठवाड्याचा दुष्काळ हटवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतलेल्या विशेष प्रयत्नातून या कामाला आवश्यक निधीची तरतूदही केली आहे, त्यामुळे या कामाला गती मिळाली आहे.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या टप्पा दोन अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा, लोहारा या तालुक्यांना दोन पूर्णांक चोवीस दशलक्ष घनफूट टीएमसी पाणी देण्याची योजना सध्या वेगाने सुरू आहे. सीना नदीवरील उद्धट बॅरेज येथून हे पाणी उचलण्यासाठी काम वेगाने सुरू आहे.आत्तापर्यंत 70 टक्के काम पूर्ण झालं असून हे काम मे च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण होईल आणि या प्रकल्पाची चाचणी मे च्या शेवटच्या आठवड्यात घेऊन जून जुलै पासून प्रत्यक्ष पाणी उचलण्याचे काम सुरू होणार आहे.
पावसाळ्यात साधारण 75 दिवस 2.24 दशलक्ष घनफूट (टिएमसी) पाणी उचलण्याची परवानगी असून यामुळे तुळजापूर, उमरगा, लोहारा तालुक्यातील दहा हजार 862 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे . आगामी काळात पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर भागात पुरामुळे उद्भवणारी संभाव्य हानी टाळण्यासाठी हे पाणी मराठवाड्याला वळवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतला असून जागतिक बँकेने याला तत्वतः मान्यता दिली आहे.
जागतिक बँकेचे पथक आगामी आठ-दहा दिवसात याची पाहणी करण्यासाठी येणार असून हे पाणी आल्यास धाराशिव जिल्ह्याच्या हक्काचं 23.66 टीएमसी पाणी मिळाल्यामुळे धाराशिव जिल्ह्याला शाश्वत पाणी मिळण्याची सोय होणार असून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात अर्थक्रांती होईल त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
जवळपास 63 किलोमीटरच्या तुळजापूर पर्यंतच्या या प्रकल्पासाठी लिफ्ट इरिगेशन पद्धतीनं आणि कालव्याद्वारे हे पाणी तुळजापूर जवळील रामदरा साठवण तलावात साठवलं जाणार आहे. या 63 किलोमीटरच्या प्रवासात काही ठिकाणी लिफ्ट द्वारे हे पाणी उचलले जाणार आहे , तर काही ठिकाणी कालव्याद्वारे हे पाणी नैसर्गिकरित्या तुळजापूरकडे आणलं जाणार आहे. या कामासाठी 600 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून हे काम जून जुलै पर्यंत पूर्ण होऊन प्रत्यक्ष पाणी येण्यासाठी सुरुवात होणार आहे.
ML/KA/SL
5 Feb. 2024