देशातील १५ राज्यांमध्ये होणार पाऊस , IMD चा अलर्ट

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे. त्यातच दिल्लीमध्ये पावसाच्या सरीही कोसळत आहेत. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात मोठा बदल झाला असून अनेक राज्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार झालं आहे. काही भागात अवकाळी पावसाच्या सरी देखील कोसळत आहे. परिणामी थंडीची लाट ओसरली असून तापमानात मोठी वाढ झाली आहे. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, पुढील 48 तासांत देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस होईल. तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण अनुभवास येणार आहे.
त्याचबरोबर काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, 5 आणि 6 फेब्रुवारी रोजी पंजाब, हरियाणा आणि दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात दाट धुके पडण्याची शक्यता आहे.
3 आणि 4 फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये हलका ते मध्यम पाऊस होईल. तर काही भागात हिमवृष्टीचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थानमध्ये 3 आणि 4 फेब्रुवारीला अवकाळी पाऊस (Heavy Rain) होईल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. तर काही राज्यांना तुफान गारपीटीचा इशारा देखील देण्यात आला आहे.
राजधानी दिल्लीत रविवारी जोरदार वाऱ्यासह वादळ येण्याची शक्यता आहे. दिल्लीतील हवामानावर वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होईल, असा IMDचा अंदाज आहे. त्यामुळे बहुतांश भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 35 किलोमीटरपर्यंत असू शकतो. दुसरीकडे हिमाचल प्रदेश, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे.4 फेब्रुवारीला पश्चिम हिमालयातील बर्फवृष्टीची तीव्रता वाढणार आहे. अरुणाचल प्रदेश आणि नागालँडच्या काही भागात हलका पाऊस पडू शकतो. केरळमध्ये 1 किंवा 2 ठिकाणी हलका ते खूप हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहिल.
SL/KA/SL
4 Feb. 2024