शिक्षण विभागाचा ३४९७.८२ कोटीचा अर्थसंकल्प सादर

 शिक्षण विभागाचा ३४९७.८२ कोटीचा अर्थसंकल्प सादर

मुंबई दि.2(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महापालिका शाळांचा दर्जा उंचावण्यासह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून २०० शाळांमध्ये खुल्या व्यायम शाळा, विद्यार्थ्यांसाठी शब्द कोश, किचन गार्डन असे नवीन उपक्रम राबवण्यात येणार आहेत. तसेच मिशन मेरीट , मिशन अँडमिशन, डिजिटल शिक्षण, २२० शाळांमध्ये कौशल्य विकास केंद्र, आयसीएसई, सीबीएसई बोर्डाच्या शाळांची उभारणी, व्हर्चुअल ट्रेनिंग सेंटर, डिजीटल क्लासरुम, विचारशील प्रयोगशाळा, आधुनिक पद्धतीचा अवलंव आदी महत्वाच्या तरतूदी यंदाच्या अर्थसंकल्पात केल्या आल्या आहेत.

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा सन २०२४ – २५ या आर्थिक वर्षासाठी ३४९७.८२ कोटींचा व १५०.६९ वाढीचा अर्थसंकल्प पालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी शुक्रवारी पालिका आयुक्त व प्रशासक इकबाल चहल यांना पालिका सभागृहात सादर केला. मागील वर्षी ३३४७.१३ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता.

मुंबई महापालिकेने मिशन अॅडमिशन एकच लक्ष्य- एक लक्ष्य ही विशेष मोहिम राबवून शाळांतील पटसंख्या वाढवली जात आहे. या मोहिमेद्वारे २०२३-२४ मध्ये १ लाख ९ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला आहे. ही मोहिम अधिक प्रभावी करून पटसंख्या वाढवली जाणार आहे. शाळांत परिक्षेच्या १०० टक्के निकालाचे उदिष्ट डोळ्यासमोर ठेऊन मिशन ३५ हा उपक्रम राबवण्यात आला आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या बदल्याबाबत ऑनलाईन सॉफ्टवेअर बनवले जाणार आहे, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी साहित्य खरेदी केले जाणार आहे. नावीन्यपूर्ण गणित आणि विज्ञान केंद्र उभारणी केली जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली.
मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना आधुनिक, दर्जेदार व डिजीटल शिक्षण देण्यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. कार्यानुभव शिक्षण ऑनलाईन, टॉय लायब्ररी, व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण, ई वाचनालय, डिजिटल क्लासरूम, टॅब पुरवठा, विद्यार्थ्यांच्या आरोग्य साधनांवर सुधारणा असा डिजीटल शिक्षणावर भर देणारा हा अर्थसंकल्प आहे. तसेच रिसोर्स इन्स्टि्युट संस्थेतर्फे पालिकेच्या विद्यार्थ्यांकरीता किचन गार्डन हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. यावर अधिक भर दिला जाणार आहे. स्काऊट गाईड अभ्यासक्रमातही याचा समावेश करण्यात आला आहे.

सद्यस्थितीत महापालिकेच्या २५ माधमिक शाळांमध्ये इंटरनेटच्या सुविधेसह ४ संगणामार्फत ई वाचनालये सुरु करण्यात आली आहेत. त्याच धर्तीवर पालिकेच्या ५० प्राथमिक शाळांमध्ये ई वाचनालये सुरु करण्यात येणार आहेत. महापालिका शालेय विद्यार्थ्यांना खगोलीय घडामोडींचे ज्ञान व त्या विषयातील जिज्ञासू वृत्ती वाढीकरीता तसेच विद्यार्थ्यांमधील निरीक्षण, एकाग्रता व आकलन क्षमतेमध्ये वाढ होऊन संशोधन वृत्ती जागरुक होण्यासाठी खगोलीय प्रयोगशाळांची साहित्यांसह उभारणी करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

मुंबई महापालिकेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात अत्याधुनिक अशा सोयी – सुविधांयुक्त इंटनेट वायफाय, अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर व अधिक काळ चालणा-या बॅटरीसह १९,४०१ टॅब पुरवण्यात आले आहेत. त्यामुळे शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात मागील वर्षीच्या अर्थसंकल्पातील बहुतांशी योजनांचा समावेश करण्यात आला आहे. या योजना प्रभावीपणे राबवल्या जाणार असून त्यासाठी यंदाही भरीव तरतूद करण्यात आली आहे.
हाऊस किपिंग – सन २०२२ ते २०२५ या कालावधीकरीता पालिकेच्या एकूण ४६९ शाळेय इमारतींची देखभाल, स्वच्छता व सुरक्षेसाठी १४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. इंद्रधनुष्य (टँलेंट शो) इंद्रधनुष्य या कार्यक्रमाद्वारे पालिका विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करण्यात आले आहे.
…..
डिजीटल क्लासरुम –
पालिकेच्या शाळांमधील एकूण ७९३४ वर्गखोल्यांपैकी एकहण २५१४ वर्गखोल्या डिजीटल करण्यात आल्या आहेत. चालू वर्षासाठी प्राथमिक शाळांना २१.२२ कोटी व माध्यमिक शाळांना ४.११ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
……
टॅबद्वारे खेळाचे शिक्षण –
नवनवीन बदलांचा विचार करून खेळातून शिक्षण या संकल्पनेवर आधारित ही सुविधा पालिकेच्या माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना पुरवण्यात आलेल्या एकूण १९४०१ टॅबमध्ये नव्याने उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
……..
ई वाचनालय –
पालिकेच्या २५ माध्यमिक शाळांमध्ये इंटरनेटच्या सुविधेसह ४ संगणामार्फत ई वाचनालये सुरु करण्यात आली आहेत. यात धर्तीवर पालिकेच्या ५० शाळांमध्ये ई वाचनालये सुरु करण्यात येणार आहेत. यासाठी ९५ लाखाची तरतूद करण्यात आली आहे.

कौशल्य विकास पयायोगशाळा, क्रीडा संकुल, शाळांमध्ये खगोलशास्त्र प्रयोग शाळा स्थापन केले जाणार आहे. तसेच अग्निशामक साहित्य आणि उपकरणाची खरेदी, शाळांमध्ये बोलक्या संरक्षक भिंतींची निर्मिती करण्यासाठी भरीव तरतूद, वन्यजीव आणि जैवविविधतेच्या माहितीकरिता उपक्रम, शिक्षण दस्तऐवजांचे संवर्धन आदींसाठी तरतूद करण्यात आली आहे.
………………
अर्थसंकल्पात वाढ –
मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा मागील वर्षी ३३४७.१३ कोटी रुपये इतका अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यंदा २०२४- २५ या वर्षासाठी ३४९७.८२ कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. त्यामुळे २०२३ – २४ च्या अर्थसंकल्पात १५०.६९ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिंडे यांनी पालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंग चहल यांना सादर केला.
……..
विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण –
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत पारंपारिक शिक्षण पद्धती झालेल्या मूलभूत बदलांमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासाबरोबर कौशल्य विकासावर देखील भर देण्यात आलेला आहे. कौशल विकासावर आधारित शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणे हा मुख्य उद्देश असल्याने महापालिकेच्या निवडक शाळांमधील मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येईल. सदर उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर १९६ शाळांमधील नववी व दहावीच्या १२ प्रकारच्य़ा अभ्यासक्रमांसह एकूण २२० कौशल्य विकास केंद्र स्थापन केली जाणार आहे. यासाठी १० कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
……
ग्रंथालयांना अनुदान –
पालिकेच्या मालकीची एकूण २९ सार्वजनिक ग्रंथालये मुंबई मराठी ग्रंथालय या संस्थेमार्फत चालवली जात आहेत. सभासद संख्या विचारात घेऊन १९ ग्रंथालयांकरीता मुंबई मराठी ग्रंथालयास ३७.५० लाख इतके अनुदान देण्यात आले आहे. तसेच दि एसियाटीक सोसायटी या संस्थेस ५० लाख अनुदान देण्यात आले आहे. या ग्रंथालयांसाठी १.५० कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
…………
बदल्यांसाठी सॉफ्टवेअर –
मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या बदल्यांमध्ये पैशांचा व्यवहार होत असल्याचा आरोप केला जातो. हा आरोप खोडून काढण्यासाठी बदल्यांबाबत ऑनलाईन सॉफ्टवेअर विकसित करण्याचे नियोजित आहे. मुख्याध्यापक व शिक्षकांच्या बदल्यांचे धोरण निश्चित करून मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी ऑनलाईन सॉफ्टवेअरद्वारे पारदर्शकपणे बदल्या करण्यात येतील शासन नियमानुसार पात्र शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतील. बदलीस पात्र असलेल्या शिक्षकांना शाळांची पसंतीक्रम देण्यात येईल. त्यांनंतर बदली करण्यात येईल.
………
दिव्यांगांसाठी उपक्रम –
पालिकेच्या १८ विशेष शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांकरता तपासणी व निदान केले जाईल. फिजिओ, स्पीच आणि ऑक्युपेशनल थेरपी साठी आवश्यक साहित्य खरेदी करून दिले जाणार आहे. शालेय इमारतीच्या संरक्षक भिंतीवर आतल्या बाजूस विद्यार्थ्यांना शैक्षणिक नैतिक मूल्य व सामाजिक जबाबदारीचे संदेश देणारे चित्रांचे रेखाटन केले जाणार आहे. राज्य शासनाच्या धर्तीवर पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी शाळांमध्ये नावीन्यपूर्ण गणित व विज्ञान केंद्र उभारली जाणार आहेत.
………
२७ शालेय वस्तू –
शालेय उपयोगी २७ प्रकारच्या वस्तूंचा दोन वर्षासाठी मोफत पुरवठा करण्यासाठी १६२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
नवीन योजना आणि प्रकल्प
ऑरगॅनिक फार्मिंग (किचन गार्डन)

महापालिकेच्या विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयक आवड निर्माण व्हावी, यासाठी शहरी शेती उपक्रमांतर्गत ऑरगॅनिक फार्मिंगवर (किचन गार्डन) ही योजना महापालिकेच्या दोन शाळांमध्ये सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीची संकल्पना समजावून भाज्या पिकवण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या पिकवलेल्या भाज्यांचा वापर मुलांच्या मध्यान्ह भोजनामध्ये केला जात आहे. आगामी काळात महापालिकेच्या १०० शाळांमध्ये ऑरगॅनिक फार्मिंगचा प्रयोग राबवण्यात येणार आहे.
शिक्षक- विद्यार्थ्यांना शब्दकोश

महापालिका शाळांमधील पाचवी ते दहावीच्या सुमारे १ लाख ७० हजार विद्यार्थ्यांना मॉर्डन स्कूल डिक्शनरी (इंग्रजी-मराठी) तसेच शिक्षकांसाठी प्रत्येक शाळेला एक शब्दकोश याप्रमाणे १ हजार २०० शाळांना अॅडव्हान्स डिक्शनरी (इंग्रजी-मराठी) देण्यात येणार आहे.
लेखन-संभाषण विकासावर भर

विद्यार्थ्यांमधील लेखन आणि संभाषण कौशल्यासाठी व्याकरणावर भर दिला जाणार आहे. मराठी भाषा चांगली लिहिता-बोलता यावी, यासाठी नववी आणि दहावीच्या १९ हजार ४०१ विद्यार्थ्यांना व्याकरणाची पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
खुल्या व्यायाम शाळा
मुंबई महापालिकेच्या २०० शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी खुल्या व्यायामशाळा सुरू करण्यात येणार आहेत. ही योजना राज्य सरकारच्या जिल्हा नियोजन समिती-मुंबई उपनगर आणि मुंबई महापालिकेच्यावतीने राबवण्यात येणार आहे.

SW/KA/SL

2 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *