संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात

नवी दिल्ली,दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज (३१ जानेवारी) अधिवेशन झाले. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार 9 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनामध्ये राष्ट्रपतींचं अभिभाषण, अंतरिम अर्थसंकल्प सादर करणं आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव आणि चर्चा अशा गोष्टी या अधिवेशनाच्या केंद्रस्थानी असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली स्थापन झालेल्या सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील संसदेचं हे अखेरचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ठरणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे सर्वांचं लक्ष असून, त्यादरम्यान नेमक्या कोणत्या घोषणा केल्या जाणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.
उद्या (१ फेब्रु) देशाचा 2024-25 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत सादर करणार आहेत. यंदाचा अर्थसंकल्प अंतरिम असला तरीही निवडणुकांच्या धर्तीवर मतदार आणि त्याहूनही देशातील सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवत सरकार नेमक्या कोणत्या घोषणा करतं याकडे सर्वांचं लक्ष असेल.
दरम्यान या महत्त्वपर्ण अधिवेशनात सर्व खासदारांना हजर राहता यावे यासाठी गेल्या अधिवेशनात निलंबित करण्यात आलेल्या खासदारांचं निलंबन रद्द करण्यात आले आहे. यामध्ये राज्यसभा व लोकसभेच्या खासदारांचा समावेश आहे. या खासदारांना मागील हिवाळी अधिवेशनात निलंबित करण्यात आले होते. या खासदारांवर लोकसभेत स्मोक बॉम्ब प्रकरणात चौकशीची मागणी करत सभागृहात गदारोळ घातल्याचा आरोप होता.
हिवाळी अधिवेशनात तब्बल १४६ खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आले होते. मात्र आता त्यांचे निलंबन रद्द झाल्याने त्यांना बुधवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात सहभागी होता येणार आहे. उर्वरित ११ राज्यसभा खासदारांना विशेषाधिकार समितीने दोषी ठरवले होते. मात्र उपराष्ट्रपती धडकड यांनी आपले अधिकार वापरून त्यांचे निलंबन रद्द केले आहे. त्यामुळे सर्व खासदार अधिवेशनात सहभागी होऊ शकणार आहेत.
SL/KA/SL
31 Jan. 2024