अयोध्येतील स्थावर मालमत्तांच्या किमतीत तब्बल 180 % नी वाढ

 अयोध्येतील स्थावर मालमत्तांच्या किमतीत तब्बल 180 % नी वाढ

अयोध्या, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्रीराम मंदिराच्या उभारणीमुळे देशातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ म्हणून अयोध्या नगरीचे रूप आता आमूलाग्र पालटत आहे. अल्पावधितच येथील पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या आहेत.इथे वर्षभरव लाखो पर्यटकांची वर्दळ असणार आहे. हे लक्षात घेऊन उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येच्या विकासाची (Ayodhya Development) जबाबदारी प्रसिद्ध टाऊन प्लॅनर दिक्षु कुकरेजा यांच्यावर सोपवली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील रिअल इस्टेटच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. गेल्या 3 महिन्यांत येथील मालमत्तेच्या किमतीत सुमारे 180 टक्के वाढ झाली आहे. मॅजिकब्रिक्सच्या माहितीनुसार, अयोध्येतील मालमत्तेची किंमत ऑक्टोबर 2023 मध्ये 3,174 रुपये प्रति चौरस फूट होती. ही किंमत आता जानेवारी 2024 मध्ये वाढून 8,877 रुपये प्रति चौरस फूट झाली आहे.

अयोध्या जिल्ह्याच्या मुद्रांक आणि नोंदणी विभागानुसार, 2017 ते 2022 पर्यंत मालमत्ता नोंदणीमध्ये 120 टक्के वाढ झाली आहे. 2017 मध्ये अयोध्येत एकूण 13,542 मालमत्तांची नोंदणी झाली होती. तर 2022 मध्ये ही संख्या 29,889 मालमत्तांवर पोहोचली. रिअल इस्टेट कन्सल्टन्सी ANAROCK ग्रुपच्या मते, जमिनीचा दर 1,000 ते 2,000 रुपये प्रति चौरस फूट होता, जो आता 4,000 ते 6,000 रुपये प्रति चौरस फूट आहे.

ज्येष्ठ नागरिक अयोध्येतील निवासी जागांमध्ये गुंतवणूक करण्यास अधिक इच्छूक असल्याचे दिसत आहे. अयोध्येतील निवासी मालमत्तांच्या शोधात 6.25 पट वाढ झाली आहे. यावरून अयोध्येतील निवासी मालमत्ता खरेदीकडे लोकांची उत्सुकता वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहराच्या काही भागात हे दर इतके वाढले आहेत की स्थानिकांना मालमत्ता खरेदी करणे कठीण झाले आहे. राम मंदिराचे उद्घाटन आणि शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासामुळे गेल्या सहा महिन्यांत मालमत्तेच्या किमती अतिशय उच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. या संधीचा फायदा घेण्यासाठी इतर अनेक जिल्ह्यांतून व भागांतून येणाऱ्या खरेदीदारांनी येथे चढ्या दराने मालमत्ता खरेदी केली आहे. त्यामुळे भाव वाढले आहेत.

शहराव्यतिरिक्त फैजाबाद रोड, चौदाह कोसी परिक्रमा, रिंग रोड, नयाघाट आणि लखनौ-गोरखपूर हायवेच्या आसपास लोक मालमत्ता खरेदी करत आहेत. हे क्षेत्र राम मंदिराच्या 6-20 किलोमीटरच्या परिघात आहे. त्यामुळे येथे गुंतवणूकदारांची उत्सुकता वाढत आहे.

SL/KA/SL

26 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *