प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये नारीशक्तीची झलक

 प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये नारीशक्तीची झलक

नवी दिल्ली, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रजासत्ताक दिनानिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर कर्तव्यपथावर झालेल्या दिमाखदार परेडमध्ये देशाच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीचे दर्शन जगाला घडले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रमुख पाहुणे होते. देशाच्या सामरिकशक्तीचे आणि विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगतीचे प्रदर्शन देखील यावेळी करण्यात आले. विकसित भारत आणि भारत-लोकशाहीची जननी थिमवर आधारित असलेले यंदाचे पथसंचलन महिलाकेंद्रित होते. त्यामुळे कर्तव्यपथावर जवळपास ८० टक्के महिलांचा समावेश होता. १०० महिला वादकांनी या पथसंचलनाला सुरुवात केली आणि तिन्ही सैन्यदलांतील महिलांनी चित्तथरारक कवायती करून, देशाला महिलांच्या शौर्याची जाणीव करून दिली. यंदाच्या फ्रान्सच्या सैन्य दलाने देखील या परेडमध्ये सहभाग घेतला.

विविध राज्याच्या चित्ररथातून तेथील संस्कृती आणि परंपरेचे यथार्थ दर्शन रंगतदारपणे सादर करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ लक्ष वेधून घेत होता. यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकच्या 350 व्या वर्षानिमित्त महाराष्ट्राचा चित्ररथ साकारण्यात आला होता. चित्ररथावर शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे दृष्य साकारण्यात आले होते. चित्ररथाच्या पुढील भागात बाल शिवरायांसह विराजमान झालेल्या राजमाता जिजाऊंचा पुतळा लक्ष वेधून घेत होता. रथासह महाराष्ट्रातील पारंपारिक वेशभूषेत रणरागिणी महिला दांडपट्टा चालविताना दिसत होत्या.

भारतीय हवाई दलाच्या फ्लाय-पास्टमध्ये १५ महिला वैमानिकांनी सहभाग घेतला होता. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांनी नारीशक्ती दाखवून देताना विविध साहसी कलाकृतींचे दर्शन घडविले. २६५ महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी मोटरसायकलवर उभे राहून शौर्य आणि चित्तथरारक कवायती सादर केल्या. त्यामध्ये त्यांनी मोटरसायकलवर स्वार होऊन, रायफल्स, तलवार, कॅमेरा व लॅपटॉप हाताळले.

SL/KA/SL

26 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *