सात दशकांनंतर या मुस्लिम देशात होणार मद्यविक्री

रियाध, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुस्लिम राष्ट्र असलेल्या सौदी अरेबियामध्ये नागरी कायदे अत्यंत कडक आहेत. कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या दोषी व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाते. इस्लामिक शरिया कायद्यांतर्गंत काही मुस्लिम देशांमध्ये मद्य सेवन आणि विक्री बाबत कडक कायदे करण्यात आले आहेत. कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करणाऱ्या सौदी अरेबिया या देशात आता तब्बल सात दशकांनंतर मद्यविक्रीला पुन्हा सुरुवात होणार आहे. सध्या इथे फक्त बिगर मुस्लिम मुत्सद्दी व्यक्तीच मद्य, बिअर किंवा वाईन खरेदी करू शकतील. त्यासाठी त्यांना ओळखपत्र दाखवावे लागणार आहे.
सौदी अरेबियाचे पंतप्रधान आणि क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (MBS) यांनी राजधानीच्या सर्वात पॉश भागात हे स्टोअर सुरू करण्यास मान्यता दिली होती. याचे एक कारण म्हणजे MBS ला 2030 पर्यंत सौदी अरेबियाला व्यवसाय आणि पर्यटनाचे केंद्र बनवायचे आहे आणि या बाबतीत तो शेजारील इस्लामिक देश UAE शी स्पर्धा करत आहे.
सप्टेंबर 2022 मध्ये, MBS ने व्हिजन 2030 ची अधिकृत घोषणा केली. मात्र, काही काळापूर्वी या कामाला सुरुवात झाली होती. या अंतर्गत कठोर इस्लामिक आणि शरिया कायद्यासह देशात अनेक बदल होताना दिसत आहेत. दारूच्या दुकानांना मान्यता देणे हे यापैकीच एक आहे.
येथे मद्य खरेदी करण्यासाठी जाणाऱ्या राजनैतिक अधिकाऱ्यांना अधिकृत ओळखपत्र दाखवावे लागेल. या आधारावरच त्यांना परमिट जारी केले जाईल. कोणताही बिगर मुस्लिम मुत्सद्दी मद्य खरेदी करू शकणार नाही.
राजा अब्दुलअजीझ यांनी एका भीषण घटनेनंतर 1952 मध्ये दारू पिणे आणि खरेदी आणि विक्रीवर बंदी घातली होती. त्यांचा मुलगा प्रिन्स मिशारीचा एका पार्टीत ब्रिटीश मुत्सद्दी सिरिल उस्मान यांच्याशी वाद झाला होता. दोघेही दारूच्या नशेत होते. वादाचे रुपांतर मारामारीत होते आणि मिशारीने सिरिलला गोळ्या घातल्या. त्यात सिरिलचा मृत्यू झाला. राजकुमार मिशारी हत्येप्रकरणी दोषी आढळले. पण, सौदीमध्ये ‘ब्लड मनी’ कायदा आहे. या अंतर्गत मृत व्यक्तीच्या कुटुंबाने गुन्हेगाराच्या कुटुंबाशी तडजोड केल्यास त्याला माफ केले जाऊ शकते. यासाठी गुन्हेगाराकडून परस्पर करारानुसार पीडितेला ठराविक रक्कम दिली जाते.सिरिल उस्मानच्या पत्नीने ‘ब्लड मनी’ अंतर्गत मोठी रक्कम घेतल्यानंतर राजकुमार मिशारीला माफ केले होते. तथापि, त्यानंतर मिशारी जवळजवळ अज्ञातच राहिले आणि 2000 मध्ये त्यांचे निधन झाले.
SL/KA/SL
25 Jan. 2024