सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही उभारण्यात येणार मतदान केंद्रे
मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये मतदारांची संख्या वाढावी यासाठी आता निवडणूक आयोगाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. शहरी मतदारांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आता शहरातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्येदेखील मतदान केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. ज्या गृहनिर्माण सोसायटीत मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहेत, त्या सोसायटीतील रहिवाशांबरोबरच त्या सोसायटीच्या बाहेरच्या नागरिकांना देखील त्या ठिकाणी मतदान करण्यासाठी जावं लागणार आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेल्या जिल्ह्यांमधे अशी मतदान केंद्रे तयार करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) दिल्या आहेत. त्यानंतर पुण्यातील 36 गृहनिर्माण सोसायट्यांमध्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र तयार करण्याचं निश्चित करण्यात आलं आहे.
या आधीच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या मतदान केंद्रांवरच मतदान करता येत होतं. निवडणूक आयोगाच्या या ताज्या निर्णयानंतर आता मात्र शहरातील गृहनिर्माण सहकारी सोसायट्यांमध्येही मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. शहरी मतदारांमधील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी घेतलेल्या या निर्णयाला काही ठिकाणी मतदार आणि राजकीय पक्षांकडून आक्षेप घेतला जाण्याची देखील शक्यता आहे.
दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीची तारीख ही 16 एप्रिल ठरल्याचं निवडणूक आयोगाचं एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे. निवडणुकीच्या कामासाठी फक्त संदर्भ म्हणून ही तारीख नोंद केल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं. त्यामुळे 16 एप्रिल रोजी निवडणूक होणार या बातम्यांना आता ब्रेक लागला आहे.
SL/KA/SL
23 Jan. 2024