श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने देशभरात 1.25 लाख कोटींची उलाढाल
मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काल अयोध्येत संपन्न झालेल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे देशभर उत्साहाची लाट उसळली होती. देशभरात या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.देशभरात हर्षोल्हास निर्माण करणाऱ्या या अभूतपूर्व घटनेमुळे बाजारपेठेलाही झळाळी प्राप्त झाली आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने वर्तवलेल्या अंदाजानुसार अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या कार्यक्रमामुळे देशात सुमारे 1.25 लाख कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. यामध्ये एकट्या दिल्लीत सुमारे 25 हजार कोटी रुपयांच्या वस्तू आणि सेवांची तर उत्तर प्रदेशमध्ये सुमारे 40 हजार कोटी रुपयांची विक्री झाली आहे.
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स कॅटचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी म्हटले आहे की, श्रद्धेमुळे आणि भक्तीमुळे एवढा मोठा पैसा व्यापारातून देशाच्या बाजारपेठेत येण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे हा सर्व व्यवसाय छोटे व्यापारी आणि छोटे उद्योजक करत होते. त्यामुळे या पैशामुळे व्यवसायात आर्थिक तरलता वाढेल. राम मंदिरामुळे देशात नवीन व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्याचबरोबर लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगारही मिळेल. आता वेळ आली आहे जेव्हा उद्योजक आणि स्टार्टअप्सनी त्यांच्या व्यवसायात नवीन आयाम जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या माहिती नुसार, गेल्या काही दिवसांत राम मंदिराच्या लाखो प्रतिकृती, हार, पेंडेंट, बांगड्या, बिंदी, बांगड्या, राम झेंडे, राम पटके, राम टोप्या, राम चित्रे, राम दरबाराची चित्रे, राम मंदिराची छायाचित्रे आदींची विक्री प्रचंड झाली आहे. या काळात पुरोहितवर्गानंही देशभरात मोठ्या प्रमाणात उत्पन्न कमावले. करोडो किलो मिठाई आणि सुका मेवा प्रसाद म्हणून वाटण्यात आला. कोट्यवधी रुपयांचे फटाके, मातीचे दिवे,कंदील पितळेचे दिवे, फुले, अगरबत्ती आणि पूजेच्या इतर वस्तूही देशभरात मोठ्या प्रमाणात विकल्या आहेत.
दरम्यान येत्या काळात अयोध्येत श्रीराम दर्शनासाठी जाण्यासाठी देशभरातून लाखो लोक उत्सुक असल्यामुळे यात्रा आणि पर्यटन व्यवसालाही झळाळी प्राप्त होणार आहे. या निमित्ताने देशभरातील धार्मिक पर्यटनालाही मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून या क्षेत्रात रोजगारही मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहेत.
SL/KA/SL
23 Jan. 2024