शतकांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत विराजमान झाले प्रभू श्रीराम

अयोध्या, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शतकांची प्रतीक्षा, श्रीरामभक्तांनी केलेल्या अतुलनीय त्याग आणि प्रखर संघर्षानंतर आज श्रीरामनगरी अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तींची वेदमंत्रांच्या घोषामध्ये विधीवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. देशातील आणि परदेशांतील करोडो रामभक्तांनी अतिशय हर्षोल्हासित अंतःकरणाने हा अभूतपूर्व असा सोहळा टिव्ही स्क्रीनसमोर बसुन अनुभवला. न भूतो न भविष्यती अशा अभूतपूर्ण सोहळ्यात प्रभू श्रीरामाची अयोध्येतील भव्यदिव्य राम मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. 12.29 या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली.
तब्बल 500 वर्षांनंतर प्रभू श्रीराम विधीवत राम मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुष्ठान पूर्ण केलं. यावेळी हेलिकॉप्टरमधून पृष्पवृष्टी करण्यात आली. या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली होती. कलाकार, खेळाडूंसह देशभरातील नागरिक अयोधामध्ये आले होते. प्राणप्रतिष्ठावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात उपस्थित होते. प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा हा आनंदाचा सोहळा जगभरातील लोकांनी ‘याची देही याची डोळा पाहिला.
अयोध्येसह संपूर्ण देशासाठी आजचा दिवस अतिशय खास आहे. तब्बल 500 वर्षांनंतर आज श्रीराम अयोध्येत विराजमान आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभ मुहूर्तावर नवनिर्मित राम मंदिरात श्रीरामांचा अभिषेक केला. मंगळवार, 23 जानेवारीपासून सर्वसामान्यांना रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे.भगवान राम अयोध्येतील त्यांच्या भव्य महालात विराजमान आहेत. गर्भगृहात पूजा करून पंतप्रधान मोदींनी रामलल्लाचा अभिषेक केला. राम मंदिराच्या भव्य अभिषेकनंतर आता अयोध्येत 10 लाख दिवे लावून दीपोत्सव कार्यक्रम साजरा केला जात आहे. भाविकांनी प्रथम हनुमानगढी मंदिरात दीपप्रज्वलन करून दीपोत्सवाला सुरुवात केली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही दीपोत्सव कार्यक्रमासाठी शरयू घाटावर पोहोचले आहेत.
SL/KA/SL
22 Jan. 2024