मराठा आरक्षणासाठी अखेर जरांगे मुंबईकडे रवाना…

जालना, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एकीकडे 22 जानेवारी रोजी आयोध्या नगरीत श्रीराम मंदिराच्या उद्घाटनासाठी संपूर्ण देशात उल्हासाचे वातावरण आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटलांसह मराठ्यांचे भगवे वादळ मुंबई कडे रवाना झाले आहे. या दोन्ही घटनाकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
मुंबईला निघण्यापूर्वी अंतरवाली सराटी येथूनच आमरण उपोषणास सुरुवात करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा आता पुन्हा तापला असून मुंबईसाठी मराठा आंदोलक रवाना झाले आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी असो किंवा नसो मराठा आरक्षणाचा लढा आता चालूच राहील.
आज 20 जानेवारी शनिवार रोजी अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलकांच्या सोबत मुंबईकडे रवाना झाले. तत्पूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मुंबई पदयात्रेची सुरुवात केली.
सोबत ट्रॅक्टर, ट्रक, यासह कार अशी वाहने सोबत घेण्यात आली आहेत. वाहनांमध्ये पाणी, जेवणाची व्यवस्था, थंडी, ऊन, पावसापासून बचावासाठी सर्व साहित्य सोबत घेण्यात आले आहेत. यावेळी अंतरवाली सराटी येथून निघत असताना महिलांनी मनोज जरांगे पाटील यांचे औक्षण केले.
मराठा आंदोलक अंतरवाली सराटी ते मुंबई ज्या मार्गावरून जाणार आहेत त्या मार्गावरील ठीक ठिकाणी आंदोलकांची व्यवस्था करण्यासाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये मराठा बांधवांनी व्यवस्था केली आहे.
ML/KA/SL
20 Jan. 2024