श्रीरामप्रभूंच्या मूर्तीचा पहिला फोटो आला समोर

अयोध्या, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाल्मिकी रामायण, रामचरितमानस, रामरक्षा, भावार्थ रामायण अशा अनेक धार्मिक साहित्य रचनांमधुन प्रभू श्रीरामचंद्रांच्या सगुण रुपाचे मोहक वर्णन करण्यात आले आहे. या विविध वर्णनांमधुन भारतीय जनमानसाच्या ह्रदयात श्रीरामाचे रूप कोरले गेले आहे. त्यानंतर आता अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा होणाऱ्या मूर्तीचे दर्शन व्हावे यासाठी रामभक्तांचे डोळे आसुसले होते. अखेर ती प्रतिक्षा संपली आहे. आज श्रीरामांच्या अत्यंत मोहक अशा मूर्तीचा पहिला फोटो समोर आला आहे.
मूर्तीचे रुप सर्वांच्या मनात भरले असून मूर्तीच्या चेहऱ्यावरचे भाव स्पष्ट पाहता येत आहे. मूर्ती काळ्या पाषाणापासून बनलेली आहे जी रामांचे भव्य बालस्वरूप दर्शवते. श्रीरामांच्या कपाळावर तिलक असून एका हातात धनुष्य व दुसऱ्या हातात बाण आहे. चेहऱ्यावर हलके हसू आहे आणि त्यांचे डोळे उघडे आहेत. मात्र, रामलल्लाचा हा फोटो गर्भगृहात बसण्यापूर्वीचा आहे. अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा विधींना १६ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे.
कारागिरांनी ही मूर्ती राममंदिरात बसवल्यानंतर आणि काही धार्मिक विधी पार पडल्यानंतर आता रामलल्लाच्या डोळ्यांवरची पट्टी दूर करण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच रामलल्लाचा चेहरा समोर आला आहे. पाच वर्षांच्या मुलाच्या रुपातील रामलल्लाची लोभस मूर्ती पाहताक्षणीच अनेकांच्या नजरेत भरत आहे. मैसूरच्या अरुण योगीराज यांनी काळ्या पाषाणातील रामल्ल्लाची ही मूर्ती कोरली आहे. ही मूर्ती सात फुटी असून तिचे वजन १५० किलो इतके आहे.
SL/KA/SL
19 Jan. 2024