पाकवर पुन्हा सर्जिकल स्ट्राइक, या देशाने नष्ट केला दहशतवाद्यांचा अड्डा

नवी दिल्ली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतावर कुरघोडी करण्यात आघाडीवर असणाऱ्या पाकिस्तानला आता मुस्लिम राष्ट्र असलेल्या इराणने धडा शिकवला आहे. इराणने मंगळवारी (दि. १७) रात्री पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील सुन्नी दहशतवादी संघटना ‘जैश-अल-अदल’च्या तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ला केला. इराणची सरकारी वृत्तसंस्था IRNA ने ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे माहिती दिल्यानंतर काही वेळाने वृत्तसंस्थेने ही बातमी आपल्या पोर्टलवरून काढून टाकली.यानंतर रात्री 2 वाजण्याच्या सुमारास या प्रकरणाची पहिली प्रतिक्रिया पाकिस्तानकडून आली. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले- इराणने आमच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केले आहे. यादरम्यान दोन मुलांचा मृत्यू झाला, तर तीन मुली जखमी झाल्या. याचे गंभीर परिणाम इराणला भोगावे लागतील.
पाकिस्तान पुढे म्हणाला- इराणचे हे पाऊल अधिक त्रासदायक आहे कारण दोन्ही देशांमध्ये संवादाचे अनेक माध्यम आहेत. आम्ही तेहरानमधील इराण सरकारशी संपर्क साधून त्यांना आमची भूमिका सांगितली आहे.
इराणच्या राजनैतिकालाही समन्स बजावण्यात आले आहे. दहशतवाद हा संपूर्ण जगाला धोका आहे आणि त्याला एकत्रितपणे सामोरे जावे लागेल, असे आम्ही नेहमीच म्हटले आहे. पण, अशा एकतर्फी कारवाईमुळे इराण आणि पाकिस्तानचे संबंध बिघडतील.इराणी मीडियानुसार, पाकिस्तानचा ज्या भागावर हल्ला झाला तो ग्रीन माउंटन म्हणून ओळखला जातो. सध्या याप्रकरणी पाकिस्तानी लष्कराकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
इराण हा शिया बहुसंख्य देश आहे, तर पाकिस्तानमधील सुमारे 95% लोक सुन्नी आहेत. पाकिस्तानातील सुन्नी संघटना इराणला विरोध करत आहेत. याशिवाय बलुचिस्तानची जैश-अल-अदल ही दहशतवादी संघटना इराणच्या सीमेत घुसून तेथील लष्करावर अनेकदा हल्ले करत आहे. इराणच्या सैन्याला रिव्होल्युशनरी गार्ड म्हणतात. दहशतवादी संघटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी इराण सरकारने पाकिस्तानला अनेकदा इशारा दिला आहे.
जैश अल-अदालचे बहुतांश दहशतवादी हे इतर पाकिस्तानी दहशतवादी संघटनांमधून आलेले आहेत. इस्रायल-हमास युद्धात इराण हमासला उघडपणे पाठिंबा देत आहे आणि पाकिस्तानही या प्रकरणात हमासला पाठिंबा देत आहे.
जैश-अल-अदल २०१२ मध्ये स्थापन झालेली दहशतवादी संघटना आहे, जे मोठ्या प्रमाणात पाकिस्तानातील सीमेपलीकडे कार्यरत आहे. या संघटनेने यापूर्वी बॉम्बस्फोट आणि इराणच्या सीमा पोलिसांचे अपहरण केले आहे. इराणने सीमाभागात अतिरेक्यांविरोधात लढा दिला, पण पाकिस्तानवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला करणे इराणसाठी असाधारण आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील डोंगराळ भागात हे हल्ले झाल्याचे इराणच्या वृत्तात म्हटले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
SL/KA/SL
17 Jan. 2024