धारावीकरांना मिळणार ३५० चौरस फूटाच्या सदनिका

 धारावीकरांना मिळणार ३५० चौरस फूटाच्या सदनिका

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टीचे भाग्य आता उजळणार आहे. मुंबईसारख्या जगप्रसिद्ध शहराच्या व्यवस्थेवर ताण निर्माण करणारी आणि लौकिकात बाधा निर्माण करणारी इथली अव्यवस्था दूर व्हावी आणि या झोपडपट्टीच्या जागी राहण्याजोगी घरे निर्माण व्हावीत यासाठी आता महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहे. अदानी कंपनीच्या मदतीने धारावी पुनर्वसनाचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे अदानींच्या हाती मुंबई जाईल अशी धास्ती निर्माण केली जात आहे. याला उत्तर देत आज धारावीमधील (Dharavi) पात्र रहिवाशांना स्वतंत्र स्वयंपाकघर आणि शौचालये असलेले किमान 350 चौरस फूट आकाराचे सदनिका मिळणार आहेत, अशी घोषणा अदानी समूह (Aadani Group) आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील संयुक्त उपक्रम असलेल्या धारावी पुनर्वसन प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने (डीआरपीपीएल) या विशेष हेतू कंपनीने आज केली. धारावीतील घराचे हे क्षेत्रफळ मुंबईतील अन्य झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांमध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल 17 टक्के अधिक आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड (डीआरपीपीएल) ही अदानी समूह आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील संयुक्त उपक्रम म्हणून स्थापन केलेली एक विशेष उद्देश कंपनी आहे. धारावीकरांना आधुनिक घरे उपलब्ध करून देऊन आणि त्यांच्या अंगभूत उद्योजकतेची भावना जपतानाच त्यांच्या जीवनात परिवर्तन आणि सुधारणा करण्याचे डीआरपीपीएलचे उद्दिष्ट आहे. मनुष्य केंद्रीभूत ठेवून केले जाणारे हे परिवर्तन मोकळ्या जागेची पुनर्बांधणी आणि नव्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेले सामुदायिक राहणीमान, वाहतूक सुविधा, वीज, पाणी आणि इंटरनेट या अत्याधुनिक अत्यावश्यक बाबींवर आधारित आहे आणि स्वच्छ वातावरण असलेल्या तेथील परिपूर्ण नागरी सुविधा दर्जाचा मानदंड उभा करतील.

पात्र निवासी सदनिका म्हणजे 1 जानेवारी 2000 च्या आधी अस्तित्वात असलेल्या सदनिका आहेत. प्रत्येक फ्लॅटमध्ये स्वतंत्र स्वयंपाकघर आणि स्वतंत्र शौचालय असेल आणि हे फ्लॅट्स सुरक्षित असण्यासोबतच त्यात चांगला उजेड असेल. ते हवेशीर आणि आरोग्यदायी असतील. धारावीची चैतन्यमय आणि वेगळी उद्योजकीय संस्कृती अबाधित ठेवून धारावीचा व्यावसायिक आणि औद्योगिक परिसर म्हणून विकास करण्याचा आणि जागतिक स्तरावर जोडलेले शहर बनवण्याचा डीआरपीपीएलचा प्रयत्न आहे.

“सर्व धारावीकरांसाठी नवीन सदनिका या स्वप्नातील घरे असतील आणि त्यांचे राहणीमान उंचावतील. धारावीकरांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब प्रत्येक घरात दिसेल. सर्वसामान्य मुंबईकरांच्या भावनांमध्ये ते नेहमीच दिसत असते. धारावी पुनर्वसन प्रकल्पात धारावीचा आत्मा अबाधित राखून ही स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे धारावी पुनर्वसन प्रकल्प प्रा. लि. च्या (डीआरपीपीएल)ने सांगितले. धारावीकरांचे जीवनमान उंचावणे, आर्थिक संधी, भविष्य घडविणारे शिक्षण तसेच व्यावसायिक प्रशिक्षण, आधुनिक आरोग्य सुविधा आणि दर्जेदार जीवनशैली हे सारे धारावी आणि नवी धारावी येथे उपलब्ध असेल. त्यांच्यासाठी सामाजिक सभागृहे, मनोरंजन क्षेत्र, सार्वजनिक उद्याने, दवाखाने आणि मुलांसाठी संगोपन केंद्रे देखील असतील, असे आश्वासन देखील डीआरपीपीएलने दिले आहे.

SL/KA/SL

15 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *