पद्मभूषण पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक राशिद खान यांचे निधन

कोलकाता, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पद्मभूषण पुरस्कार विजेते प्रसिद्ध शास्त्रीय गायक राशिद खान यांचे आज कोलकाता येथे निधन झाले. राशिद खान यांच्यावर कोलकाता येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. ते दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देत होते. अखेर आज दुपारी 3.45 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.राशिद खान प्रोस्टेट कर्करोगाने त्रस्त होते. गेल्या महिनाभरापासून ते कोलकाता येथील खासगी रुग्णालयात दाखल होते. मंगळवारी राशिद खानची प्रकृती एवढी गंभीर झाली होती की त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
रुग्णालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राशिद खान उपचारांना चांगला प्रतिसाद देत होते. त्यांच्या वैद्यकीय प्रकृतीत झालेली सुधारणा पाहून डॉक्टरांना देखील आनंद झाला. आजारी असूनही राशिद खान यांच्या दिनचर्येत कोणताही बदल झाला नव्हता. कोलकात्याच्या रुग्णालयातही रोज शास्त्रीय संगीताचा सराव करत असत. मात्र नंतर त्यांची प्रकृती खालावली.
राशिद खान यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गायकाच्या निधनावर शोक व्यक्त केला. म्हणाल्या – संपूर्ण देशासाठी आणि संपूर्ण संगीत जगतासाठी ही मोठी हानी आहे. मला खूप वेदना होत आहेत कारण मला अजूनही विश्वास बसत नाही की राशिद खान आता नाहीत.
राशिद खान यांनी वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी गायला सुरुवात केली होती. 2007 मध्ये रिलीज झालेल्या ‘जब वुई मेट’ चित्रपटातील ‘आओगे जब तुम सजना’ या लोकप्रिय गाण्याला त्यांनी आवाज दिला. याशिवाय या ज्येष्ठ गायकाने ‘अल्ला ही रहम’, ‘तोहे बिना मोहे चैन नहीं’, ‘सजना’ आणि ‘दीवाना कर रहा है’ यांसारख्या प्रसिद्ध गाण्यांनाही आपला आवाज दिला आहे.राशिद खान यांना 2006 मध्ये ‘पद्मश्री’ आणि ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले होते. 2022 मध्ये त्यांना भारत सरकारने ‘पद्मभूषण’ पुरस्कारानेही सन्मानित केले होते.
SL/KA/SL
9 Jan. 2024