ओल्या हरभर्याची आमटी
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रूढार्थानी आमटी प्रकार जरी असला तरी सूप म्हणूनही तसा फार चांगला आहे.
एक वाटी सोललेले ओले हरभरे
तिखट पणा नुसार हिरव्या मिरच्या – कमी तिखट, पोपटी मिरची असेल तर २-३ तरी हव्यात
जरासा जास्त लसूण – इतक्या हरभर्यांसाठी ५-६ पाकळ्या तरी हवा
चिमूटभर हिंग
चवीनुसार मीठ
चिमूटभर साखर
२ मोठे + १ लहान चमचा तेल
क्रमवार पाककृती:
एका बाजूला पाणी गरम करत ठेवावे.
दुसरीकडे सोललेले हरभरे, मिरच्यांचे तुकडे अन सोललेल्या लसूण पाकळ्या एका जाड बुडाच्या कढईत कोरड्याच भाजायला घ्यायच्या; मंद आचेवर. नीट भाज बसली नाही तर आमटीला जी अपेक्षित चव आहे ती साधत नाही.
चांगले ५-७ मिनिटं भाजून झाले – मिरच्या लसूण हरभरे यांना काळसर डाग पडले की एक लहान चमचा तेल त्यावर घालायचे आणि पुढे परतत राहायचे. लगेच ते सगळं प्रकरण खर्पुसेल. चांगलं खमंग झालं की गॅस बंद करून थंड होऊ द्यायचं.
गार झालं की मिक्सर ला गुळगुळीत पेस्ट करायची. पाणी वापरून अर्थात.
त्याच तेलाच्या कढईत उरलेलं तेल तापवून मोहोरीची फोडणी करायची, मोहोरी तडतडली की हिंग आणि लगेच वर ही पेस्ट घालायची. मीठ, साखर ही घालावी. पेस्ट तेलात ४-५ मिनिटं परतून वर बर्यापैकी पातळ होईल इतकं कढत पाणी यात ओतायचं. उकळी येइस्तो मोठ्या आचेवर सतत ढवळत राहायचं. उकळी फुटली के पुढे अजून १० मिनिटं तरी आमटी उकळू द्यावी. जरा थिक झाली की ५-७ मिनिटं झाकण घालून मुरू द्यावी आणि गरमगरमच खायला घ्यावी.
PGB/ML/PGB
23 Sep 2024