पुरीच्या जगन्नाथ मंदिरात आजपासून ड्रेस कोड लागू

जगन्नाथपुरी, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या वर्षभरापासून देशभरातील विविध मोठ्या देवस्थानांमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात येत आहे. मंदिरात शिस्त पाळणे, भारतीय संस्कृतीचे पालन करणे आणि मंदिराचे पावित्र्य राखणे अशा विविध कारणांमुळे मंदिर प्रशासन ड्रेसकोड लागू करत आहेत. आज सुरु झालेल्या नवीन वर्षापासून ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड अनिवार्य करण्यात आला आहे. नवीन वर्ष 2024 च्या पहिल्या दिवसापासून मंदिर परिसरात पान-गुटखा खाण्यास आणि प्लास्टिकच्या वस्तू वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे, असे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले.
श्री जगन्नाथ मंदिर प्रशासन अधिकाऱ्याने सांगितले की, हाफ पँट, शॉर्ट्स, फाटलेल्या जीन्स, स्कर्ट आणि स्लीव्हलेस कपडे परिधान केलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.मंदिर प्रशासनाने ड्रेस कोडबाबत 9 ऑक्टोबर रोजीच एक आदेश जारी केला होता, ज्यामध्ये अंमलबजावणीची तारीख 1 जानेवारी होती.ड्रेस कोडचा नियम लागू झाल्याने सोमवारी मंदिरात येणारे पुरुष भक्त धोतर आणि टॉवेल परिधान करताना दिसले. तर महिला साडी किंवा सलवार-कमीज परिधान करताना दिसल्या. अधिकाऱ्याने सांगितले की, मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी आवारात गुटखा आणि पान खाण्यास बंदी घालण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्यांना दंड ठोठावला जात आहे. मंदिराच्या सिंहद्वारावर तैनात सुरक्षा दल आणि मंदिरातील प्रतिहारी सेवक त्यावर लक्ष ठेवतील.
सेंट्रल रेंजचे महानिरीक्षक आशिष कुमार सिंह यांनी सांगितले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी पहिल्या दिवशी जवळपास दुप्पट भाविकांनी मंदिरात दर्शन घेतले आहे. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास भाविकांचे आगमन सुरू झाले. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भगवान जगन्नाथाच्या दर्शनासाठी अडीच लाखांहून अधिक भाविकांनी गर्दी केली आहे. मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर लोक रांगेत उभे असल्याचे दिसून आले. दुपारी 12 वाजेपर्यंत 1 लाख 80 हजारांहून अधिक भाविकांनी जगन्नाथ धामचे दर्शन घेतले आहे.पुरीचे पोलीस अधिकारी समर्थ वर्मा यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे – भाविकांना कोणत्याही त्रासाशिवाय दर्शन घेता यावे, यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच अपंग भाविकांसाठी पोलिसांकडून विशेष सोय करण्यात आली आहे. SJTA आणि पोलीस प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांची तसेच आसनव्यवस्थेची व्यवस्था केली आहे.
SL/KA/SL
1 Jan. 2024