हिंदू महिला लढणार पाकिस्तानमध्ये निवडणूक

 हिंदू महिला लढणार पाकिस्तानमध्ये निवडणूक

पेशावर, दि. २६ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकिस्तानामध्ये हिंदूंना डावलल्या जाण्याच्या आणि हिंदू महिलांवर अत्याचार होत असल्याचा अनेक घटना आपण वाचल्या असतील. मात्र आता पहिल्यांदाच तेथील हिंदू समाजासाठी एक सकारात्मक बातमी समोर येत आहे.

25 वर्षीय डॉ. सवीरा प्रकाश यांना बिलावल भुट्टो झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीने (PPP) खैबर पख्तुनख्वा प्रांतातून विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट दिले आहे. सवीरा बुनेर जिल्ह्यातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांचे वडील ओम प्रकाश यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच एक हिंदू महिला विधानसभा निवडणूक लढवत आहे.

सवीरा यांनी खैबर पख्तुनख्वामधील PK-25 या जागेवरून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय महिलांसाठी राखीव असलेल्या एका जागेसाठीही सवीरा यांनी उमेदवारी दाखल केली आहे. पाकिस्तानमधील चार राज्यांच्या नॅशनल असेंब्ली आणि प्रांतीय विधानसभांसाठी ८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

रुबिना खालिद खैबरमधील एका जागेवरून सिनेटर आहेत. त्यांनी सवीराला निवडणूक लढवण्यासाठी धैर्य आणि प्रेरणा दिली. यानंतर पीपल्स पार्टीने बुनेर जिल्ह्यातून सवीरा यांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला. खुद्द रुबिनाने याची घोषणा केली.
सवीराचे वडील म्हणाले- माझी मुलगी सवीरा एक सक्षम उमेदवार आहे. 8 फेब्रुवारीला होणारी निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय राखीव जागेवरूनही त्यांचा दावा पक्का झाला आहे. ओमप्रकाश हे स्वत: निवृत्त डॉक्टर आहेत. ते 35 वर्षांपासून पीपीपीचे सदस्य आहेत.

सवीराने गेल्या वर्षी अबोटाबाद इंटरनॅशनल मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस केले. त्या बुनेरमधील पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या महिला शाखेच्या सचिवही आहेत. तिकीट मिळाल्यानंतर सवीरा म्हणाल्या- माझे वडील डॉ. ओम प्रकाश यांच्याप्रमाणे मलाही गरिबांची सेवा करायची आहे. मी 23 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ती म्हणाली- मला नेहमीच महिला आणि गरीबांसाठी काम करायचे होते. महिलांना सुरक्षित वातावरण आणि त्यांचे हक्क प्रदान करणे ही आपली जबाबदारी आहे. सध्या ते दुर्लक्षित आहेत. मानवतेसाठी काम करणे माझ्या रक्तात आहे.

सवीरासाठी निवडणूक लढवणे हेही मोठे आव्हान असेल. याचे कारण म्हणजे खैबर पख्तूनख्वाची सीमा अफगाणिस्तानशी आहे. बुनेर जिल्हा हा सीमावर्ती जिल्हा आहे. पाकिस्तान आणि अफगाण तालिबान येथे अनेकदा हल्ले करत असतात. येथे दररोज पाकिस्तानी सैनिकांवर हल्ले होतात.

SL/KA/SL

26 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *