मसूर डाळीवरील शून्य आयात शुल्क कालावधीत वाढ

 मसूर डाळीवरील शून्य आयात शुल्क कालावधीत वाढ

नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील अन्नधान्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे.खाद्यतेलापाठोपाठ आता देशात स्वस्त डाळ उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलले आहे. सरकारने मसूर डाळ आयातीवरील शून्य शुल्काचा कालावधी 31 मार्च 2024 ते 31 मार्च 2025 पर्यंत वाढवला आहे. आता आयातदारांना मार्च 2025 पर्यंत मसूर डाळीच्या आयातीवर कसलेच शुल्क भरावे लागणार नाही.

लोकसभा निवडणुकीसाठी आता अवघे 3 महिने उरले आहेत. मार्च 2024 च्या पहिल्या आठवड्यानंतर आचारसंहिता लागू होईल. त्यानंतर सरकार कोणतेही निर्णय घेता येणार नाहीत. त्यामुळे सरकारला महागाईबाबत कोणताही धोका पत्करायचा नाही. यामुळेच सरकारने मार्च 2025 पर्यंत मसूरची आयात शुल्क मुक्त केली आहे. असा या निर्णयाचा उद्देश असल्याचे मानले जात आहे.

सरकारने मसूर आयातीवर आयात शुल्क सवलतीचा कालावधी 31 मार्च 2025 पर्यंत वाढवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी 21 डिसेंबर रोजी अधिसूचना जारी केली आहे. नोव्हेंबर महिन्यासाठी किरकोळ महागाईत वाढ झाली आहे. खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्याने किरकोळ महागाई दरात वाढ नोंदवली आहे. याध्ये डाळींच्या भाववाढीचा मोठा वाटा आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये डाळींचा महागाई दर 20.23 टक्के झाला आहे. ऑक्टोबरमध्ये हा आकडा 18.79 टक्के होता.

एका वर्षाच्या कालावधीत मसूर डाळीच्या दरात कोणताही मोठा बदल झालेला नाही. सरकारी आकडेवारीनुसार, 22 डिसेंबर 2022 रोजी मसूर डाळीची सरासरी किरकोळ किंमत 94.83 रुपये तर कमाल किंमत 134 रुपये प्रति किलो होती. मसूर डाळीची सरासरी किंमत 22 डिसेंबर 2023 रोजी किंचित घसरणीसह 93.97 रुपयांवर आली आहे. तर कमाल किमत 153 रुपये प्रति किलोपर्यंत वाढली आहे.

SL/KA/SL

24 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *