पाणी नियोजन अभावी महाराष्ट्राची वाटचाल वाळवंटा कडे

सांगली, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रात जंगलांची परिस्थिती भयानक होत चालली आहे. लचके तोडून जंगले उध्वस्त केले जात आहेत, तर दुसरी कडे योग्य पाणी नियोजन नसल्यामुळे महाराष्ट्राची वाटचाल वाळवंटा कडे सुरू आहे, अश्या परिस्थितीत निसर्ग संवर्धन करणे हेच मानवासाठी उपयुक्त आहे, यासाठी पक्षी प्रेमी, निसर्गप्रेमी यांनी जागरूक राहणे गरजेच आहे, असं मत पश्चिम घाट पर्यावरण संवर्धक राजेंद्र केरकर यांनी व्यक्त केले.
सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 36 व्या महाराष्ट्र राज्य पक्षी मित्र संमेलनाचे उदघाटन केरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजेंद्र केरकर हे बोलत होते. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ वन्यजीव अभ्यासक आणि महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य अजित ऊर्फ पापा पाटील हे आहेत. तर पर्यावरणवादी डॉ. रवींद्र होरा हे संमेलनाचे स्वागतअध्यक्ष आहेत.
संमेलन आयोजन कमिटीचे अध्यक्ष शरद आपटे, डॉ. एरिच भरूचा, पक्षी मित्र संघटनेचे अध्यक्ष जयंत वडतकर यांच्या सहीत राज्यभरातून मोठ्या संख्येने पक्षीमित्र या संमेलनात सहभागी झाले आहेत.
जंगले खल्लास होत आहेत, प्रदुषणामुळे नद्यांच्या गटारी होत आहेत. तर भरमसाठ पाण्याचा उपसा सुरू असून पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन केले जात नाही. निसर्ग संवर्धनासाठी पक्षीप्रेमींनी जागरूकपणे प्रयत्न केले तरच जंगलं भविष्यात टिकू शकतील असे सांगून राजेंद्र केरकर पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या तुलनेत गोवा राज्यामध्ये निसर्ग संवर्धनाचे काम चांगल्या प्रकारे सुरू आहे. निसर्ग संवर्धनासाठी राज्य सरकार बरोबरच तेथील लोकही जागरूकपणे काम करत असतात. संपूर्ण देशामध्ये 30 टक्के क्षेत्रावर जंगल आहे, मात्र गोव्यामध्ये 60 टक्के भागावर जंगल आहे.
पूर्ण देशामध्ये एकमेव गोव्यातच जनतेला राजकारणी घाबरतात, कारण निसर्गाच्या विरोधात जर काही काम सुरू झालं की गोव्यातील लोक त्याला विरोध करतात वेळप्रसंगी न्यायालयात सुद्धा जातात, असे सांगून राजेंद्र केरकर पुढे म्हणाले, निसर्ग टिकला तरच पक्षी टिकतील आणि पक्षांचे जीवन सुंदर असेल तरच माणसांचे सुंदर जीवन असणार आहे असेही केरकर यांनी यावेळी सांगितलं.
ML/KA/PGB 22 Dec 2023