कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय महिलांचा ऐतिहासिक विजय

नवी मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली भारतीय महिलांच्या क्रिकेट संघ सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. आज भारतीय महिला क्रिकेटपट्टूनी विशेष कामगिरी करत चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्या महिला क्रिकेट संघात मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने इंग्लंडला 347 धावांनी हरवले आहे. महिलांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी 1998 मध्ये श्रीलंकेने पाकिस्तानचा 390 धावांनी पराभव केला होता.
या एकमेव कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने दीप्ती शर्मा, हरमनप्रीत कौर, जेमिमा आणि यास्तिका भाटिया यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 428 धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात केवळ 136 धावा केल्या. भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधीक 5 विकेट घेतल्या होत्या.
या ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने म्हटले की, सामना जिंकून आनंद वाटतोय. आम्ही सुरुवातीपासून सामना कसा जिंकायचा याचा विचार करत होतो. आम्ही आखलेल्या योजना आम्हाला अंमलात आणायच्या होत्या त्यात आम्ही यशस्वी ठरलो. सर्व खेळाडूंनी जबाबदारी स्वीकारली आणि सर्वोत्तम कामगिरी केली.
इंग्लंडची कर्णधार हीदर नाईटने म्हटले की, भारताने उत्कृष्ट खेळ केला. या पीचवर धावा काढणे कठीण होते. मात्र भारताने पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली. आम्हाला पाहिजे तसा खेळ होऊ शकला नाही, परंतु आम्ही या अनुभवातून बरेच काही शिकलो आहोत.
SL/KA/SL
16 Dec. 2023