आमदारांची घरे जाळण्या प्रकरणी विशेष तपास पथक

नागपूर, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड शहर आणि माजलगाव इथे मराठा आंदोलनाच्या वेळी झालेल्या दंगल आणि जाळपोळ प्रकरणी दोन दिवसात विशेष तपास पथक स्थापन करून पुढील कारवाई करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. नियमित कामकाजातील याबाबतच्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते.
संदीप क्षीरसागर यांनी ती उपस्थित करताना त्यांचे घर पेटवून देताना घडलेल्या घटनांचा उल्लेख करीत त्यांनी मराठा आंदोलकांनी हे कृत्य केलं नाही असं सांगितलं. त्यावर जयंत पाटील यांनी उप प्रश्न विचारले होते.
आतापर्यंत २७८ जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी ३० सराईत गुन्हेगार आहेत, माजलगाव प्रकरणी ४० तर बीड प्रकरणी ६१ जण अद्याप फरार आहेत. ज्यांचा सक्रिय सहभाग आढळून आला आहे त्यांनाच अटक केली आहे, यात कोणत्याही पक्षीय भेदाभेद केलेला नाही, सर्वपक्षीय कार्यालये आणि निवासस्थाने यात लक्ष करण्यात आली होती. यामागचे मास्टर माईंड कोण तेही शोधलं जात आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
एकलहरे इथे सौर ऊर्जा
नाशिक येथील एकलहरे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात नवीन संच बसवून तिथे निर्माण होणारी वीज परवडणारी नाही त्यामुळे तेथील जागेत सौर यंत्रणा बसवून वीज निर्मिती केली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली.
सरोज अहिरे यांनी ती उपस्थित केली होती. जयंत पाटील यांनी उप प्रश्न विचारले. एकलहरे प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविल्या जातील अशी ग्वाही त्यांनी दिली.
ML/KA/SL
15 Dec. 2023