संसद सभागृहात गॅलरीतून उड्या, उडाला गदारोळ

 संसद सभागृहात गॅलरीतून उड्या, उडाला गदारोळ

नवी दिल्ली, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना आज लोकसभेत एक धक्कादायक घटना घडली आहे. लोकसभेचं कामकाज सुरू असताना दोन तरुण सभागृहात शिरले. प्रेक्षक गॅलरीतून या दोघांनी सभागृहात उड्या मारल्या. सुरक्षा व्यवस्था भेदून सभागृहात आले आणि खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावू लागले होते.

यावेळी पिठासीन अध्यक्षांनी या दोघांना पकडण्यास सांगितलं. काही खासदार या दोघांना पकडण्यासाठी धावले. दरम्यान, पिठासीन अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांनी लोकसभा दोन वाजेपर्यंत स्थगित केली होती. त्यानंतर पूर्ण दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.

सभागृहात धावत असताना खासदारांनी या तरुणांना पकडलं. त्याआधी या दोघांनी बूटातून काहीतरी काढलं आणि सभागृहात धूर पसरू लागला. त्यांनी स्मोक कॅनचा वापर केला असावा असं सांगितलं जात आहे. म्हैसूरचे खासदार प्रताप सिंह यांच्या मदतीने या दोघांनी प्रेक्षक सभागृहाचा पास (परवाना) बनवून घेतला होता. दरम्यान, सभागृहात हा प्रकार सुरू असताना संसदेच्या बाहेर एक महिला घोषणा देत होती. या महिलेलालाही ताब्यात घेण्यात आलं आहे.

सभागृहातील गदारोळ पाहून सर्व खासदार सभागृहाबाहेर पडले. यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंतही बाहेर आले आणि त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. सावंत यांनी सभागृहात घडलेल्या घटनेची माहिती देताना सांगितलं की,

लोकसभेचं कामकाज सुरू असताना अचानक दोन जण प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात आले. एका खांबाच्या मदतीने ते प्रेक्षक गॅलरीतून खाली आले. दोघांनी लागोपाठ उड्या मारल्या. मग दोघेही खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत धावत होते. तेवढ्यात त्यातल्या एकाने बूट काढले, तो बूट काढत होता तेव्हा काही खासदारांनी त्याला घेरलं. त्याचप्रमाणे दुसऱ्या इसमालाही पकडलं. त्याचवेळी सभागृहात गॅस पसरू लागला. पिवळ्या रंगाचा गॅस दिसत होता. तो गॅस कसा आला ते माहिती नाही. पण या गॅसमुळे नाकाला आणि डोळ्यांना त्रास होत होता. सुरक्षारक्षकांनी या दोन्ही इसमांना ताब्यात घेतलं आहे.

संसदेत घुसखोरी केल्या तरुणांची नावे सागर शर्मा आणि मनोरंजन डी अशी आहेत. यातील सागर हा लखनौच्या अलामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामनगर येथील रहिवासी आहे. तर मनोरंजन हा कर्नाटकातील म्हैसूरचा रहिवासी आहे. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी म्हैसूर पोलिसांच्या मदतीने मनोरंजनच्या कुटुंबियांशी संपर्क केला आणि चौकशी सुरू केली.

SL/KA/SL

13 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *