पुरुष कनिष्ठ हॉकी स्पर्धेत भारतीय संघ उपांत्यफेरीत
नवी दिल्ली, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मलेशियात क्वाललंपूर इथे सुरू असलेल्या पुरुषांच्या कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतानं उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या आज झालेल्या सामन्यात मध्यंतराला ०-२ अशा पिछाडीवर पडलेल्या भारतानं नेदरलँडला ४-३ असं नमावलं.
५ व्या मिनिटाला टिमो बोअर्स आणि १६ व्या मिनिटाला पेपीन व्हॅन डर हेजडेन यांनी पेनल्टी कॉर्नर वर गोल करत नेदरलँडला २-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र ३४ व्या मिनिटाला आदित्य लालगे यानं मैदानी, तर ३६ व्या मिनिटाला अरजित सिंग हुंदल यानं पेनल्टी स्ट्रोक वर गोल करत भारताला २-२ अशी बरोबरी साधून दिली. ऑलिव्हीयर हॉर्टेनसियस नं 44 मिनिटाला पेनल्टी कॉर्नर वर गोल करत नेदरलँडला पुन्हा एकदा ३-२ अशी आघाडी मिळवून दिली.
शेवटची आठ मिनिटं शिल्लक असताना भारताच्या हातून सामना निसटतो की काय अशा परिस्थितीत ५२ व्या मिनिटाला सौरभ कुशवाहनं मैदानी गोल करत भारताला ३-३ अशी बरोबरी साधून देत पुन्हा एकदा सामन्यामध्ये परत आणलं, तर शेवटची तीन मिनिटं शिल्लक असताना बॉबी सिंग धामीने सरकवलेला चेंडू गोल जाळ्यात धाडत कर्णधार उत्तम सिंगनं ५७ व्या मिनिटाला मैदानी गोल करत भारताच्या विजयावर अखेर शिक्कामोर्तब केलं.
उपांत्य फेरीत भारताची गाठ आता परवा १४ डिसेंबरला जर्मनी विरुद्ध पडणार आहे. Indian team in semi-finals of men’s junior hockey tournament
ML/KA/PGB
12 Dec 2023