विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू

नागपूर, दि. ७ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज सकाळी नागपुरात सुरूवात झाली, दोन्ही सभागृहात वंदे मातरम् आणि राज्य गीताने कामकाजाला प्रारंभ झाला. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहासमोर सादर केल्या.
विधानसभेत कामकाज सुरू असतानाच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न करत होते मात्र अध्यक्षांनी त्यांना उशिरा परवानगी दिली. राज्यात सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, फक्त चाळीस तालुके दुष्काळी जाहीर केलेत बाकीचे नाही, बाकीच्यांसाठी नेमलेल्या उपसमीतीची अद्याप बैठकच झालेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे, राज्य सरकारने हात वर केले आहेत, सरकारच्या उपाययोजना तोकड्या आहेत, टंचाई सदृश्य हा नवा शब्द आणून फसवणूक केली आहे, राज्यातील २२ जिल्हे उध्वस्त झाले आहेत असा आरोप वडेट्टीवार यांनी यावेळी केला , सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत करून कर्जमाफी करा आणि यावर नियम ५७ ची सूचना देत सर्व कामकाज बाजूला करून चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या सूचनेला परवानगी नाकारली आणि उद्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यावर चर्चेची सूचना द्यावी अशी सूचना केली.
सरकारच्या वतीने यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले. चाळीस तालुके केंद्र सरकारच्या निकषात बसतात म्हणून दुष्काळी घोषित केले आहेत, जे बसत नाहीत त्यांना राज्य सरकार तेवढीच मदत देणार आहे, दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर पर्यंत मर्यादा वाढवली आहे, ndrf च्या दुप्पट मदत देत आहोत असं सांगत कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्याला पूर्ण मदत करू अशी ग्वाही त्यांनी सभागृहात दिली.
यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विद्यमान सदस्य गोवर्धन शर्मा, माजी सदस्य बबनराव ढाकणे, गुलाबराव वामनराव पाटील, श्रीपतराव शिंदे , शेख रशीद शेख शफी , राजाराम ओझरे, वसंतराव कार्लेकर , गोविंद शेंडे , दिगंबर विशे यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला त्याला सभागृहाने संमती दिली आणि दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून आदरांजली वाहील्यानंतर सभागृहाचे आजचे कामकाज संपल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले.
विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नवाब मलिक यांच्याबद्दल मुद्दा उपस्थित करत सरकारला घेरले. दाऊद इब्राहिम शी जवळीक असण्याचा ज्याच्यावर आरोप केला त्या व्यक्तीच्या मांडीला मांडी लावून कसे बसलात असा सवाल त्यांनी केला , त्यावर आम्ही बसलेलोच नाही मात्र असे आरोप होऊन ही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करणाऱ्या लोकांना आम्हाला विचारण्याचा नैतिक अधिकार काय असा प्रतिप्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना केला.
ML/KA/SL
7 Dec. 2023