प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाईचा बडगा

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धाटाव एमआयडीसीतील अनेक रासायनिक कंपन्यांमधील लाखो लिटर सांडपाणी प्रक्रिया न करता दररोज कुंडलिका नदीत सोडले जाते. त्यामुळे नदी काळवंडली असून उग्र दर्प येतो. याबाबत सोमवारी (ता.४) ‘सकाळ’ मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत, पाण्याचे नमुने घेतले. या पाण्यात रसायन आढळल्याने एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी कारखानदार आणि एमआयडीसीला नोटीस बजावली आहे.
धाटाव एमआयडीसीतील काही रासायनिक कंपनीचे अधिकारी येथील सीईटीपी केंद्रातील कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी करून सांडपाण्यावर प्रक्रिया न करता थेट नाल्यात सोडतात. हा गोरखधंदा मध्यरात्री ते पहाटेपर्यंत होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे. Action taken by Pollution Control Board
अवकाळी पावसात दूषित पाणी तर थंडीत धुक्याचा गैरफायदा घेत घातक रसायने हवेत सोडली जातात. त्याचा मानवी जीवनाबरोबरच पशु-पक्ष्यांवर गंभीर परिणाम होतो. येथील आरे, कुंभोशी, गोफण या ठिकाणी पाण्याचे नमुने घेताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी राज कामत, डॉ. राजेश औटी, एमआयडीसीच्या रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे ठेकेदार उपस्थित होते.
कुंडलिका नदीकाठी जाऊन दूषित पाण्याचे काही नमुने तपासले. त्यात नदीच्या पाण्यात रसायन सदृश द्रव्य आढळले आहेत. ते चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले असून त्या चाचणीच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.
– राज कामत, वरिष्ठ अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ
पर्यावरण कायद्यांतर्गत घातक व इतर रासायनिक सांडपाण्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने करणे बंधनकारक करण्यात यावे. कारखानदारांनी रासायनिक सांडपाणी थेट नदीत सोडणे बंद करावे. सीईटीपीने रासायनिक सांडपाण्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने तातडीने करावी. त्यासाठी कारखानदार आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
– समीर शेडगे, तालुकाप्रमुख, ठाकरे गट
ML/KA/PGB
5 Dec 2023