‘गो फर्स्ट’ विमान कंपनीच्या सीईओंचा राजीनामा

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘गो फर्स्ट’ या विमान कंपनीचे सीईओ कौशिक खोना यांनी राजीनामा दिला आहे. गो फर्स्ट Go First कंपनीच्या विमानांची सर्व उड्डाणे निलंबित केल्यानंतर आणि कंपनीविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू केल्यानंतर सुमारे सात महिन्यांनी कौशिक खोना Kaushik Khona यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. खोना यांनी यापूर्वी २००८ ते २०११ या काळात ‘गो फर्स्ट’ एअरलाइन्सबरोबर काम केलं होतं. आतापर्यंत गो फर्स्टमध्ये खोनासह किमान पाच सीईओ होते. विनय दुबे, कॉर्नेलिस व्रीस्विजिक, वुल्फगँग प्रॉक-शॉअर आणि ग्रोगिओ डी रोनी यांनीही ‘गो फर्स्ट’चे सीईओ म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.
ऑगस्ट २०२० मध्ये कौशिक खोना हे ‘गो फर्स्ट’मध्ये सीईओ म्हणून परत आले होते. खोना यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या ई-मेलमध्ये म्हटलं की, जड अंतःकरणाने मला तुम्हाला कळवायचं आहे की, आज माझा कंपनीबरोबरचा शेवटचा दिवस आहे. मला ऑगस्ट २०२० मध्ये पुन्हा एकदा ‘गो फर्स्ट’साठी काम करण्याची संधी मिळाली. तुमच्या सक्षम आणि सक्रिय पाठिंब्यामुळे मी माझ्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला.
“मला आशा आहे की, आपली प्रार्थना ऐकली जाईल आणि कंपनी पुन्हा सुरू होईल. किमान सर्व कर्मचार्यांचे रखडलेले पगार आणि थकबाकी मिळावी. सर्व कर्मचार्यांना त्यांचा केवळ थकीत पगार मिळावा म्हणून नव्हे तर कंपनीचे कामकाज पुन्हा सुरू व्हावे, यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण मला यात यश आलं नाही,” अशा भावना कौशिक खोना यांनी व्यक्त केल्या.
SL/KA/SL
1 Dec. 2023