अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा

 अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा

नाशिक, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील अनेक जिल्ह्यात वादळ, गारपीटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. यासह कांदा, मका, ऊस, टोमॅटो, फळबागा, ज्वारी , तूर, कापूस, पालेभाज्या आदी पिकांनाही अवकाळीचा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे मदत , पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिले आहेत.

आज निफाड तालुक्यातील मौजे रौळस, पिंपरी आणि कसबे सुकेणे या गावांत मंत्री अनिल पाटील यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची शेतात जाऊन पाहणी केली तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार दिलीप बनकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, यांच्यासह अधिकारी , ग्रामस्थ उपस्थित होते.

मंत्री अनिल पाटील यांनी मौजे रौळस, पिंपरी आणि कसबे सुकेणे या तिनही गावांत प्रत्यक्ष भेट देवून नुकसानीची पाहणी करत बाधित शेतकऱ्यांची विचारपूस केली. यावेळी बोलतांना मंत्री अनिल पाटील म्हणाले की,प्रत्येक शेतावर जाऊन पंचनाम्याचा जो अंतिम वस्तुनिष्ठ अहवाल तयार होईल तो मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कोणीही आपत्तीग्रस्त नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहू नये, तसेच नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर भरीव प्रयत्न करणार असल्याचे अश्वासन मंत्री अनिल पाटील यांनी दिले आहे.

ML/KA/PGB 28 Nov 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *