देशातील आरोग्य सेवांच्या खर्चात मोठी वाढ

 देशातील आरोग्य सेवांच्या खर्चात मोठी वाढ

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतातील आरोग्य उपचारांचा महागाई दर आशिया खंडात सर्वाधिक असल्याची माहिती इन्सुरटेक कंपनी प्लमने नुकत्याच जाहीर केलेल्या ‘Health Report of Corporate India 2023’ अहवालात समोर आली आहे.
आरोग्य उपचारांच्या महागाईचा दर 14 टक्क्यांवर पोहोचला असून दिल्ली आणि मुंबईसारख्या महानगरांमध्ये पाच वर्षांत संसर्गजन्य रोगांचा खर्च दुपटीने वाढला आहे. इतर गंभीर आजारांच्या खर्चातही वाढ झाली असल्याचे अहवालात म्हटले आहे. अहवालानुसार, गेल्या 3-4 वर्षांत शेड्यूल औषधांच्या किमती 15-20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. औषधांच्या किमती वाढवण्याची ही प्रक्रियाही कोरोना महामारीनंतर सुरू झाली. त्याचबरोबर नॉन शेड्यूल औषधांच्या किमतीतही 10 ते 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

उपचारावरील वाढत्या खर्चाचा परिणाम नऊ कोटींहून अधिक लोकांवर होत आहे आणि त्याचा खर्च त्यांच्या एकूण खर्चाच्या 10 टक्क्यांहून अधिक झाला आहे. उपचाराच्या वाढत्या खर्चामुळे नोकरदार वर्गावर आर्थिक बोजाही वाढला आहे. यापैकी 71 टक्के लोक त्यांच्या आरोग्यावरील खर्चासाठी वैयक्तिकरित्या आरोग्य विमा घेतात.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारांचा खर्च गेल्या पाच वर्षांत दुपटीने वाढला आहे. संसर्गजन्य रोग आणि श्वसनविकारांवर उपचारासाठी विम्याचे दावे झपाट्याने वाढले आहेत. आकडेवारीनुसार, संसर्गजन्य रोगाच्या उपचारांसाठी 2018 मध्ये सरासरी विमा दावा 24,569 रुपये होता, तो वाढून 64,135 रुपये झाला आहे.

अहवालानुसार केवळ 15 टक्के कर्मचाऱ्यांना त्यांच्या मालकांकडून आरोग्य विमा प्रदान केला जातो. देशातील रोजगाराच्या परिस्थितीच्या तुलनेत हा आकडा खूपच कमी आहे. एवढेच नाही तर केवळ 12 टक्के कंपन्या टेलीहेल्थ सपोर्ट देतात आणि 1 टक्क्याहून कमी कंपन्या बाह्यरुग्ण कव्हरेज देतात.

कोरोना महामारीनंतर उपचारांचा खर्च झपाट्याने वाढला असून उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यावरील खर्चही वाढला आहे. पूर्वी एकूण बिलात या वस्तूंचा हिस्सा 3 ते 4 टक्के असायचा, तो आता 15 टक्के झाला आहे. आरोग्य विम्याची मागणी वाढल्याने उपचारही महाग झाले आहेत.

SL/KA/SL

24 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *