‘लालपरी’ला मिळाली साडेपाच कोटींची दिवाळी ‘भेट’…

बुलडाणा, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागाला दिवाळीने मदतीचा मोठा हात दिला असून विभागाची खऱ्या अर्थाने ‘दिवाळी’ झाली! जेमतेम ११ दिवसातच विभागाला तब्बल ५ कोटी ४४ लाख रुपयांचे घसघशीत उत्पन्न मिळाले आहे. यादरम्यान १५ लाखांवर प्रवाश्यांची विक्रमी वाहतूक करण्यात आली.
यंदाच्या दिवाळी करिता बुलडाणा एसटी विभागाने सुसज्ज नियोजन केले होते. याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आल्याने विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. बस गाड्यांची दूरवस्था, अपुरे कर्मचारी या अडचणी असताना सुद्धा विभागाने अतुलनीय कामगिरी बजावली आहे. ८ ते १९ नोव्हेंबर दरम्यान ७ बस आगारातून जिल्ह्यातील बसनी तब्बल १६ लाख ४३ हजार ४०८ किलोमीटरचा प्रवास केला. याद्वारे १५ लाख ९ हजार प्रवाश्यांची वाहतूक करण्यात आली. यामध्ये महिलांचा मोठा वाटा असून ५ लाख ५५ हजार ६२० महिलांनी माहेर आणि सासर असा दुहेरी प्रवास केला. सुमारे साडेपाच कोटींच्या उत्पन्नात बुलडाणा आगार एक कोटी चार लाख रुपये आघाडीवर असून ९१ लाख ६१ हजार उत्पन्नासह मेहकर आगार दुसऱ्या क्रमांकावर आहे.
SL/KA/SL
22 Nov. 2023