एज्युटेक कंपनी BYJU’S च्या अडचणीत वाढ

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही महिन्यांपासून देशातील हायप्रोफाईल एज्युटेक कंपनी Byju’s ला अनेक आर्थिक संकटांनी ग्रासले आहे. त्यातच आता कंपनीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये कायद्याचे उल्लंघन झाल्याचे लक्षात आल्याने Byju’s च्या मागे आता ईडीच्या कारवाईचा बडगाही लागला आहे. सक्तवसूली संचालनालयाने, ईडीने Byju’s विरोधात फेमातंर्गत तपास सुरु केला आहे. या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. यामध्ये कंपनीने 9 हजार कोटी रुपयांची अनियमितता केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
याप्रकरणात ईडीने Byju’s ला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कंपनीने नोटीस मिळाल्याचे नाकारले आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच ईडीने बायजूशी संबंधित सर्व संस्थांची चौकशी सुरु केली होती. तपास आणि जप्तीच्या कारवाईदरम्यान अनेक सदोष कागदपत्रे आणि डिजिटल डेटा समोर आला.
ईडीच्या आकडेवारीनुसार कंपनीने या काळात परदेशातून प्रत्यक्ष गुंतवणुकीच्या नावावर जवळपास 9754 कोटी रुपये परदेशात पाठवले. कंपनीने जाहिरात आणि विपणन खर्चाच्या नावाखाली जवळपास 944 कोटी रुपये खतवले आहेत.यामध्ये परदेशातील खर्चाचा पण सहभाग आहे. ई़डीने फेमा कायद्यातंर्गत तपास केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
ईडीने कंपनीवर छापे टाकले. त्यावेळी कंपनीत 2011 ते 2023 या कालावधीदरम्यान जवळपास 28000 कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक झाल्याचे समोर आले. याप्रकरणात सखोल तपास सुरु आहे. कंपनीने 9 हजार कोटी रुपयांची अनियमितता केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणाकडे शैक्षणिक जगतासह सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
या स्टार्टअपवर देणेकऱ्यांनी एका फंड हाऊसमध्ये 53.3 कोटी डॉलर लपविल्याचा गंभीर आरोप यापूर्वी केला आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी पुन्हा बाजारातून भांडवल जमा करुन देणेकऱ्यांची परतफेड करण्याची हमी भरली होती. मात्र आत्ताच्या या आरोपांमुळे कंपनीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बाजारातही कंपनीची पत खालवल्याने कंपनीला सर्वबाजूंनी संकटांनी घेरले आहे.
SL/KA/SL
21 Nov. 2023